युपी वॉरियर्सचे आव्हान समाप्त, केरचे 5 बळी, सामनावीर मॅथ्युजचे अर्धशतक
वृत्तसंस्था/लखनौ
अॅमेलिया केरचे 5 बळी आणि हिली मॅथ्युजच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेतील सामन्यात मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्सचा 9 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे युपी वॉरियर्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेतील हा 16 वा सामना होता. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून युपी वॉरियर्सचा प्रथम फलंदाजी दिली. युपी वॉरियर्सने 20 षटकात 9 बाद 150 धावा जमवित मुंबई इंडियन्सला 151 धावांचे आव्हान दिले. मुंबई इंडियन्सने 18.3 षटकात 4 बाद 153 धावा जमवित विजयावर शिक्कामोर्तब केला.
युपी वॉरियर्सच्या डावाला हॅरीस आणि व्हॉल यांनी दमदार सुरुवात करुन देताना 48 चेंडूत 74 धावांची भागिदारी केली. हॅरिसने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 28 धावा जमविल्या. किरण नवगिरी खाते उघडण्यापूर्वी तंबुत परतली. ऑस्ट्रेलियाच्या व्हॉलने 33 चेंडूत 12 चौकारांसह 55 धावा झोडपल्या. कर्णधार दिप्ती शर्माने 25 चेंडूत 2 चौकारांसह 27, दिनेश वृंदाने 12 चेंडूत 1 चौकारासह 10, हेन्रीने 1 षटकारासह 6 तर इक्लेस्टोनने 11 चेंडूत 3 चौकारांसह 16 धावा जमविल्या. युपी वॉरियर्सच्या डावामध्ये 2 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सच्या अॅमेलिया केरने 38 धावांत 5 तर मॅथ्युजने 25 धावांत 2 तसेच नॅट सिव्हेर ब्रंट आणि सिसोदीया यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मॅथ्युज आणि अॅमेलिया केर यांनी आक्रमक फटकेबाजी करत 18 चेंडूत 24 धावांची भागिदारी केली. हेन्रीने केरला हॅरीसकरवी झेलबाद केले. तिने 13 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. हिली मॅथ्युजला नॅट सिव्हेर ब्रंटने चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 9.4 षटकात 92 धावांची भागिदारी केली. ब्रंटने 37 चेंडूत 7 चौकारांसह 23 धावा जमविल्या. हॅरीसने तिला झेलबाद केले. मॅथ्युजने 46 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 68 धावा जमविल्या. गौडने तिला झेलबाद केले. मॅथ्युजने 35 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार हरमनप्रित कौर केवळ 4 धावांवर बाद झाली. अमनज्योत कौर आणि भाटीया यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. कौरने 15 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 12 तर भाटीयाने 6 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 10 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या डावात 2 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सला अवांतर 12 धावा मिळाल्या. युपी वॉरियर्सतर्फे हॅरीसने 2 तर हेन्री आणि गौड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या स्पर्धेतील गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्स 10 गुणांसह पहिल्या स्थानावर असून मुंबई इंडियन्स 8 गुणांसह दुसऱ्या, गुजरात जायंटस् 6 गुणांसह तिसऱ्या, आरसीबी 4 गुणांसह चौथ्या तर युपी वॉरियर्स 4 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. या पराभवामुळे युपी वॉरियर्सचे बाद फेरीत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे.
संक्षिप्त धावफलक
युपी वॉरियर्स 20 षटकात 9 बाद 150 (हॅरीस 28, व्हॉल 55, दिप्ती शर्मा 27, वृंदा 10, इक्लेस्टोन 16, अवांतर 6, अॅमेलिया केर 5-38, मॅथ्युज 2-25, नॅट सिव्हेर ब्रंट आणि सिसोदीया प्रत्येकी 1 बळी), मुंबई इंडियन्स 18.3 षटकात 4 बाद 153 (मॅथ्युज 68, केर 10, नॅट सिव्हेर ब्रंट 37, हरमनप्रित कौर 4, अमनज्योत कौर नाबाद 12, भाटीया नाबाद 10, अवांतर 12, हॅरीस 2-11, हेन्री व गौड प्रत्येकी 1 बळी)









