रोहितचा फॉर्म, गोलंदाजीची चिंता
वृत्तसंस्था/ मुंबई
‘आयपीएल’मधील ‘प्लेऑफ’साठीची शर्यत तीव्र होत असताना आज मंगळवारी मुंबई इंडियन्सची गांठ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी पडणार असून त्यावेळी कर्णधार रोहित शर्माची फलंदाजी आणि शेवटच्या षटकांतील गोलंदाजी हे यजमान मुंबईसाठी चिंतेचे विषय राहणार आहेत.
रोहित शर्माचा फलंदाज या नात्याने ‘आयपीएल’मधील हा सलग दुसरा खराब हंगाम असून यंदा 10 सामन्यांमध्ये त्याला 18.39 च्या सरासरीने केवळ 184 धावा काढता आल्या आहेत आणि त्यात एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. सध्या सहाव्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत वर जाण्यासाठी त्यांच्या या सर्वोत्तम फलंदाजाला सूर मिळणे अत्यावश्यक आहे. या ‘आयपीएल’मध्ये शर्माची भूमिका आघाडीला येऊन वेगवान व चांगली सुऊवात करून देण्याची आहे आणि काही वेळा त्याला यशही मिळाले आहे. परंतु त्यात सातत्य दिसून आलेले नाही. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर तुलनेने नवीन फलंदाजांवरचा दबाव प्रत्येक वेळी वाढलेला आहे. मुंबईच्या सुदैवाने हे फलंदाजही वेळोवेळी चांगले खेळले आहेत.
रोहित शर्मा आघाडीला अपयशी ठरत असल्याने मधल्या फळीतील इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कॅमेरॉन ग्रीनसारख्या खेळाडूवर डाव सावरण्याची जबाबदारी येऊन पडत आहे. तिलक वर्मा, टीम डेव्हिड यांनी देखील क्रमवारीत खाली येऊन चांगली कामगिरी केलेली आहे. चेन्नई सुपर किंग्सविऊद्धच्या मागील सामन्यात रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु ही खेळी कुणासाठीही फायद्याची ठरली नाही. शर्मा सलग दुसऱ्यांदा शून्यावर आणि सलामीला आलेला ग्रीन सहा धावांवर बाद झाला. मुंबईला त्यामुळे 8 गडी गमावून फक्त 139 धावा काढता आल्या आणि 13 वर्षांत प्रथमच त्यांनी त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्धचा दूरस्थ सामना गमावला.
त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला त्यांच्या शेवटच्या षटकांतील गोलंदाजीबद्दल चिंता असेल. त्यांनी प्रथम गोलंदाजी करताना सलग चार सामन्यांत 200 पेक्षा जास्त धावा काढू दिलेल्या आहेत. दुसरीकडे, ‘आरसीबी’ला विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेल प्रभावी कामगिरी करतील अशी आशा असेल. कारण जेव्हा जेव्हा त्या तिघांनी चांगली कामगिरी केलेली आहे तेव्हा तेव्हा संघ विजयी ठरलेला आहे. 511 धावांसह डू प्लेसिस हा या मोसमातील 500 धावांचा टप्पा ओलांडणारा एकमेव फलंदाज आहे. जोश हेझलवूडच्या समावेशामुळे त्यांच्या मोहम्मद सिराजच्या नेतृत्वाखालील माऱ्यालाही आणखी धार आली आहे. सिराजने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 15 बळी घेतले आहेत. दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागलेला ‘आरसीबी’ 10 सामन्यांमध्ये पाच विजय आणि तितक्याच पराभवांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जोफ्रा आर्चर, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, पीयूष चावला, टीम डेव्हिड, राघव गोयल, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन, डुआन जान्सेन, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, रमणदीप सिंग, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, ट्रिस्टन स्टब्स, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहाल वढेरा, सूर्यकुमार यादव.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), आकाश दीप, फिन अॅलन, अनुज रावत, अविनाश सिंग, मनोज भांडगे, मायकेल ब्रेसवेल, वनिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, सिद्धार्थ कौल, विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, वेन पार्नेल, हर्षल पटेल, सुयश प्रभुदेसाई, राजन कुमार, शाहबाज अहमद, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, सोनू यादव, विजयकुमार वैशाख, केदार जाधव.









