वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथील वानखेडे स्टेडियमवर धोनी आणि रोहित शर्मा यांच्यातील जुगलबंदीचा फिव्हर मुंबईच्या शौकिनांना लाभणार आहे. या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघाला या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात विद्यमान विजेत्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जने लखनौ संघाचा पराभव करून आपला पहिला विजय नोंदविला. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला बेंगळूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरकडून दणदणीत पराभव पत्करावा लागला होता. या पराभवातून मुंबई इंडियन्सचा संघ सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स संघाला तब्बल एक आठवड्याची विश्रांती मिळाली असल्याने शनिवारच्या सामन्यासाठी या संघातील खेळाडू पुन्हा ताजेतवाने राहतील. या स्पर्धेतील सलामीचा सामना गमाविल्याने मुंबईच्या खेळाडूंवर निश्चितच चेन्नईच्या तुलनेत अधिक मानसिक दडपण राहील. कोहली आणि डु प्लेसिस या दोन फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत बेंगळूर संघाला विजय मिळवून दिला होता. कर्णधार धोनीने आपल्या संघातील अननुभवी गोलंदाजांना वाईड आणि नो बॉल कमी टाकण्यासाठी ताकीद दिली आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर चेन्नई संघातील मोईन अली तसेच सँटेनर यांच्या गोलंदाजीवर चेन्नईचे यश अवलंबून राहील. शनिवारच्या सामन्यासाठी कदाचित सँटेनरच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या मगालाला अंतिम अकरा खेळाडूत संधी मिळण्याची शक्यता आहे. मुंबई संघाने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. चेन्नई संघातील सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडची गेल्या दोन सामन्यातील कामगिरी दर्जेदार झाली असून त्याने सलग अर्धशतके झळकविली आहेत. गायकवाडच्या फटकेबाजीला रोखण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची सत्वपरीक्षा ठरेल. मुंबईच्या सूर्यकुमार यादवची गेल्या दोन सामन्यातील कामगिरी समाधानकारक झालेली नाही. तो धावा जमविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळते. तिलक वर्माने एका सामन्यात बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. मुंबई संघाचा आर्चर हा प्रमुख गोलंदाज आहे. शनिवारच्या सामन्यात मुंबईच्या तुलनेत चेन्नईचे पारडे निश्चितच जड वाटते. गायकवाड, कॉन्वे, रायडू, मोईन अली, स्टोक्स, जडेजा हे या संघाचे प्रमुख फलंदाज आहेत. चेन्नई आणि मुंबई यांच्यात आतापर्यंत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत 34 सामने झाले असून त्यापैकी 20 सामने मुंबईने तर 13 सामने चेन्नईने जिंकले आहेत.
संघ- मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, डेव्हिड, ब्रेव्हिस, तिलक वर्मा, इशान किशन, स्टब्ज, विष्णू विनोद, ग्रीन, रमणदीप सिंग, मुलानी, मेर्डीथ, वधेरा, शोकीन, अर्षद खान, जॅन्सेन, पीयूष चावला, कार्तिकेय, आर. गोयल, आर्चर, बेहरेनडॉर्फ, मधवाल आणि अर्जुन तेंडुलकर.
चेन्नई सुपरकिंग्ज- धोनी (कर्णधार), कॉनवे, ऊतुराज गायकवाड, रायुडू, मोईन अली, स्टोक्स, रविंद्र जडेजा, रहाणे, मगाला, शिवम दुबे, प्रेटोरियस, अजय मंडल, निशांत सिंधू, राजवर्धन हंगिरगेकर, मिचेल सँटनर, एस. सेनापती, सिमरजित सिंग, एम. पथिराणा, महेश तीक्षणा, भगत वर्मा, प्रशांत सोलंकी, तुषार देशपांडे आणि शेख रशीद.
सामन्याची वेळ- सायं. 7.30 वाजता.









