आयपीएल 2025 : घरच्या मैदानात गुजरात टायटन्स संघ ठरला भारी : साई सुदर्शनची अर्धशतकी खेळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
हार्दिक पंड्याच्या कमबॅकनंतरही मुंबई इंडियन्सला विजय काही मिळवता आला नाही. मुंबई इंडियन्सने दुसऱ्या सामन्यातही पराभवाचेच पाढे वाचले. पण दुसरीकडे गुजरातने आपल्या घरच्या मैदानात मोठा विजय साकारला. गुजरातने साई सुदर्शनच्या अर्धशतकाच्या जोरावर 196 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आणि त्यामुळेच त्यांना 36 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. साई सुदर्शनची अर्धशतकी खेळी व मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने हा सामना जिंकला.
गुजरातच्या 197 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर रियान रिकेल्टनही फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. 8 धावांवर सिराजने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर काही वेळ तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची चांगली जोडी जमली होती. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची चांगली भागीदारी रचली, पण तिलकने चुकीचा फटका मारत आपली विकेट गमावली आणि ही जोडी फुटली. तिलकने 36 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. त्यानंतर सूर्यावर सामन्याची जबाबदारी होती. हार्दिक पंड्या त्याच्या साथीला आला होता. पण सूर्या मोठा फटका मारताना बाद झाला आणि त्याने 28 चेंडूत 1 चौकार व 4 षटकारासह 48 धावा केल्या. हार्दिक पंड्याला यावेळी फटकेबाजी करायला जमली नाही आणि तो 11 धावांवर बाद झाला. नमन धीर (नाबाद 18) व सँटेनर (नाबाद 18) यांनी फटकेबाजी केली पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला 6 बाद 160 धावापर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून सिराज व प्रसिध कृष्णाने प्रत्येकी दोघांना माघारी धाडले.
गुजरातचा शानदार विजय
प्रारंभी, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिकूंन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुजरात टायटन्सचे दोन्ही फलंदाज साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी कमालीची सुरूवात करून दिली. या जोडीने 8.3 षटकांत 78 धावांची सलामी दिली. दरम्यान, शुभमन गिलला हार्दिक पंड्याने बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. शुभमनने संघासाठी 27 चेंडूमध्ये 38 धावा केल्या. यानंतर जोस बटलरने आक्रमक खेळताना अवघ्या 24 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह 39 धावांची खेळी केली. बटलर बाद झाल्यानंतर शाहरुख खाननेही 9 धावांवर विकेट गमावली.
सुदर्शनची फटकेबाजी
दुसरीकडे, साई सुदर्शनने मात्र मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करताना 41 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 63 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. सुदर्शनच्या या शानदार खेळीमुळे गुजरातला 197 धावापर्यंत मजल मारता आली. सुदर्शनचा अडथळा 18 व्या षटकांत ट्रेंट बोल्टने दूर केला. दरम्यान, शेवटच्या दोन षटकांत गुजरातने आक्रमक खेळणाऱ्या रुदरफोर्डसह राहुल तेवतिया, राशिद खान व आर साई किशोर यांच्या विकेट गमावल्या. रुदरफोर्ड 11 चेंडूत 18 धावा काढून माघारी परतला तर राहुल तेवतिया एकही चेंडू न खेळता धावबाद झाला. यामुळे गुजरातला 20 षटकांत 8 गडी गमावत 196 धावापर्यंत मजल मारता आली. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 2 बळी घेतले. ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब रेहमान व राजू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स 20 षटकांत 8 बाद 196 (साई सुदर्शन 63, शुभमन गिल 38, जोस बटलर 39, रुदरफोर्ड 18, हार्दिक पंड्या 2 बळी, बोल्ट, चहर व राजू प्रत्येकी एक बळी)
मुंबई इंडियन्स 20 षटकांत 6 बाद 160 (तिलक वर्मा 39, सुर्यकुमार यादव 48, नमन धीर नाबाद 18, सँटेनर नाबाद 18, मोहम्मद सिराज व प्रसिध कृष्णा प्रत्येकी दोन बळी).









