वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आज रविवारी आमनेसामने येणार असून राजस्थानचा धडाका थांबवण्यासाठी मुंबईला सर्व विभागांत उत्कृष्ट कामगिरी करून दाखवावी लागेल. राजस्थान रॉयल्स काही अविश्वसनीय विजयांसह गुणतालिकेत शीर्षस्थानी असून यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा त्यांचा एकतर्फी विजय समाविष्ट होतो.
राजस्थानने मागील तीनपैकी दोन सामने गमावले असले, तरी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. दुसरीकडे मुंबईसाठी काही बाबी गंभीर चिंतेच्या आहेत. यात विशेषत: त्यांची शेवटच्या षटकांतील गोलंदाजी हा मुख्य प्रश्न आहे. ही महाग गोलंदाजी त्यांच्या मागील दोन पराभवांस जबाबदार राहिली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी शेवटच्या 30 चेंडूंमध्ये 96 धावा दिल्याने पंजाब किंग्सची गेल्या आठवड्याच्या शेवटी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सरशी झाली. तर गतविजेत्या गुजरात टायटन्सविऊद्ध शेवटच्या 24 चेंडूंत त्यांनी 70 धावा दिल्या.
मुंबईच्या वरच्या फळीनेही अधिक चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. विशेषत: रोहित शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संघाच्या मोहिमेची गाडी रुळावर आणण्यासाठी प्रभावी फलंदाजी करावे लागेल. मुंबईचा संघ तळाशी असून गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर मैदानात उतरतो की नाही हे पाहणे बाकी आहे. हा इंग्लिश गोलंदाज 100 टक्के तंदुऊस्त नाही. तर जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ आणि अर्जुन तेंडुलकर हे महाग ठरलेले आहेत.
दुसरीकडे, राजस्थान मुंबई इंडियन्सच्या कमकुवत दुव्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. फलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर 200 हून जास्त धावा करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे पुरेशी ताकद आहे. त्यांच्याकडे जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल ही खात्रीशीर सलामीची जोडी आहे आणि मध्य फळीत संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर आणि त्यानंतर ध्रुव जुरेल असे आधार आहेत. गोलंदाजीत त्यांची सर्वांत मोठी ताकद नि:संशयपणे यजुवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन ही फिरकी जोडी आहे. त्यांनी आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये एकत्रित 23 बळी घेतले आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट डावाच्या सुऊवातीला प्रभावी दिसलेला असून त्याने सहा सामन्यांत नऊ बळी घेतलेले आहेत.
संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, शम्स मुलानी, रिले मेरेडिथ, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, डुआन जॅनसेन, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल. राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जोरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, आर. अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी, एम. अश्विन, के. एम. आसिफ, के. सी. करिअप्पा, डोनोवन फेरेरा, देवदत्त पडिक्कल, ओबे मॅककॉय, ज्यो रूट, कुलदीप सेन, आकाश वसिष्ठ, कुलदीप यादव, अॅडम झाम्पा, अब्दुल बासिथ.