वृत्तसंस्था/ मुंबई
पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ आज रविवारी येथे सनरायजर्स हैदराबादवर मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी आतुर असेल. कारण सारी समीकरणे त्यांच्या मनासारखी जुळून आली नाहीत, तर यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगममधील त्यांचा हा शेवटचा सामना देखील ठरू शकतो. सनरायजर्स आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेले असून मुंबई इंडियन्सकडे एक शेवटची संधी आहे. वानखेडे स्टेडियमवर उत्कृष्ट प्रदर्शन घडवून या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्यास आणि ‘प्ले-ऑफ’साठी पात्र ठरण्याची शक्यता वाढवण्यास ते उत्सुक असतील. .
चार विजय आणि दोन पराभवांसह ‘मुंबई इंडियन्स’ने त्यांच्या घरच्या मैदानाचा अनुकूलतेच नक्कीच पुरेपूर फायदा घेतला आहे आणि रोहित शर्माच्या संघाला ते चालू ठेवायचे आहे. कारण त्यांना धाव सरासरी सुधारण्याची ही अंतिम संधी आहे. राजस्थान रॉयल्सने आपले साखळी फेरीतील सामने पूर्ण केलेले असून त्यांचे 14 गुण झालेले आहेत आणि त्यांची धाव सरासरी 0.148 अशी जास्त चांगली आहे. मात्र मुंबई इंडियन्स आज एक चांगली कामगिरी करून 16 गुणांसह फेरी समाप्त करू शकतात. परंतु त्याचबरोबर त्यांना आज मोठा विजय देखील आवश्यक आहे.
सध्या चौथ्या क्रमांकावर असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर अधिक सुस्थितीत आहे. कारण त्यांची 0.180 ही धाव सरासरी मुंबई इंडियन्स (उणे 0.128) आणि राजस्थान रॉयल्सपेक्षा चांगली आहे. आरसीबी देखील आज गुजरात टायटन्सविरुद्ध दोन महत्त्वपूर्ण गुण मिळवू शकतो. परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रविवारी संध्याकाळी उशिरा हा सामना खेळविण्यात येणार असल्याने फाफ डू प्लेसिसच्या संघाला आपण नेमके काय करणे आवश्यक आहे हे समजेल. जर मुंबई इंडियन्स जिंकले आणि ‘आरसीबी’ हरले तर मुंबईच्या संधी अधिक मजबूत होतील. मात्र रविवारी जर हे दोन्ही संघ आपापले सामने जिंकले, तर धाव सरासरी महत्त्वाची ठरेल. पराभव मात्र मुंबई इंडियन्ससाठी ‘प्ले-ऑफ’ची दारे बंद करेल.
या वर्षी आयपीएल ‘प्ले-ऑफ’ची शर्यत सर्वांत तीव्र आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या दोन दिवसांनी चार ‘प्ले-ऑफ’ स्थानांपैकी तब्बल तीन जागा निश्चित केल्या आहेत. याबाबतीत कोलकाता नाईट रायडर्स पात्र ठरण्याची शक्यता खूपच कमी आहे, तर दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद बाद झाले आहेत. रोहितच्या नेतृत्वाखालील संघाला आज गेल्या दोन सामन्यांप्रमाणे संधी वाया घालवणे परवडणार नाही. गुजरात टायटन्सला त्यांनी पराभवाचे अंतर कमालीचे कमी करू दिले, तर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पाच धावांनी पराभव पत्करावा लागल्याने दोन गुण गमावले. तसे घडले नसते, तर मुंबई इंडियन्स आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सहून पुढे राहिले असते.
घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्ससाठी सर्वांत मोठी चिंता त्यांची गोलंदाजी आहे. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना चार वेळा 200 पेक्षा जास्त धावा काढू दिलेल्या आहेत आणि ‘आरसीबी’ पाचव्या खेपेला 200 धावांचा स्तर पार करण्याच्या नजीक पोहोचले होते. यामुळे त्यांचे फलंदाज गंभीर दबावाखाली आले. बऱ्याच प्रसंगी मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकांतील खराब गोलंदाजीमुळे सामन्यावरील नियंत्रण गमवावे लागलेले आहे. रोहित शर्माची फलंदाजी सातत्यपूर्ण राहिलेली नसली, तरी सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन आणि नेहल वढेरा यासारख्यांचा समावेश असलेल्या त्यांच्या फलंदाजीने कठीण आव्हाने पेलली आहेत आणि आजही ते गोलंदाजीवर तुटून पडण्याची अपेक्षा आहे. त्यातच रोहितने त्याच्या मागील दोन सामन्यांत 18 चेंडूंत 29 आणि 25 चेंडूंत 37 धावा करून फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, गमावण्यासारखे काहीही नसलेला सनरायजर्स संघ मागील सामन्यात आरसीबीविरुद्ध केली तशी कामगिरी करून स्पर्धेची अखेर विजयाने करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो.
संघ : मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस जॉर्डन, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, टीम डेव्हिड, राघव गोयल, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन,, डुआन जॅन्सन, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, रमणदीप सिंग, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, ट्रिस्टन स्टब्स, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव.
सनरायजर्स हैदराबाद : एडन मार्करम (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, फजलहक फाऊखी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेन्रिक क्लासेन, एडिन, आदिल रशिद, मयंक मार्कंडे, विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयंक डागर, नितीशकुमार रे•ाr, अकेल होसेन आणि अनमोलप्रीत सिंग.









