वृत्तसंस्था/ जयपूर
इंडियन प्रीमियर लीगमधील आज सोमवारी होणाऱ्या आपल्या शेवटच्या साखळी स्तरावरील सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स एकमेकांसमोर येतील तेव्हा पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या लढाईत सरशीच्या दृष्टीने आपले सर्वस्व पणाला लावण्याचा प्रयत्न ते करतील.
गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, मुंबई आणि पंजाब या चार संघांनी आयपीएल प्लेऑफमध्ये पूर्वीपेक्षा खूप लवकर स्थान मिळवले असल्याने उर्वरित साखळी सामने हे अंतिम स्थाने निश्चित करण्यापुरते महत्त्वाचे राहिले आहेत. 17 गुणांसह पंजाब सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. परंतु मुंबईविरुद्धचा पराभव त्यांना तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर ढकलेल, ज्यामुळे त्यांना 30 मे रोजी होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात जागा मिळेल. पंजाबला आघाडीच्या दोन संघांमध्ये स्थान मिळणे कठीण वाटते. कारण त्यांना केवळ एका भक्कम संघाविऊद्ध आज विजयाची आवश्यकता नाही, तर गुजरात (18 गुण) आणि आरसीबी (17 गुण) हे त्यांचे अंतिम सामने गमावतील अशीही आशा त्यांना बाळगावी लागेल.
दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध मागील सामना गमावलेला पंजाबला आघाडीच्या दोन संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात मुंबईवर विजय मिळवणे आवश्यक आहे. चारही पात्र संघांमध्ये मुंबईचा नेट रन रेट जास्त असून तो त्यांना फायदेशीर ठरू शकतो. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध 200 पेक्षा जास्त धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरल्यानंतर पंजाब किंग्स आज त्यांच्या गोलंदाजीतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करेल. कारण जवळ असलेल्या सीमा आणि फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीमुळे येथे भरपूर धावा निघू शकतात. त्यामुळे येथे दोन्ही संघांच्या गोलंदाजी विभागाची कसोटी लागेल.
या आघाडीवर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील मुंबईचे पारडे पंजाबच्या तुलनेत जड वाटते. मुंबईला अर्शदीप सिंग (16 बळी), युजवेंद्र चहल (14 बळी), जो दुखापतीमुळे मागील सामना खेळू शकला नव्हता आणि मार्को जॅनसेन (14 बळी) यांचे आव्हान पेलावे लागेल. सूर्यकुमार यादव (583 धावा) आणि श्रेयस अय्यर (488 धावा) हे अनुक्रमे मुंबई व पंजाबच्या फलंदाजीचे आधारस्तंभ आहेत आणि आयपीएलचा शेवट जवळ येत असताना त्यांच्या भूमिका अधिक महत्त्वाच्या बनलेल्या आहेत.
संघ : मुंबई इंडियन्स-हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, श्रीजीथ कृष्णन, बेव्हन जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, रघू शर्मा, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चहर, अश्वनी कुमार, रीस टोपले, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, विष्णू विनोद, जोश इंग्लिस, हरनूर पन्नू, पायला अविनाश, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, हरप्रीत ब्रार, मार्को जॅनसेन, अजमतुल्ला ओमरझाई, प्रियांश आर्य, एरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, मिच ओवेन, अर्शदीप सिंह, वैशाख विजयकुमार, यश ठाकूर, कुलदीप सेन, झेवियर बार्टलेट, प्रवीण दुबे, काइल जेमिसन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.









