गुजरात जायंट्सवर 55 धावांनी मात, हरमनप्रीत सामन्यात सर्वोत्तम
वृत्तसंस्था/ मुंबई
महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड कायम असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने गुजरात जायंट्सचा 55 धावांनी पराभव करून सलग पाचवा विजय मिळवला. अशा प्रकारे मुंबई इंडियन्सने बाद फेरीत प्रवेश केला असून अजून तीन सामने बाकी आहेत.
डीवाय पाटील स्टेडियमवर उद्घाटनाच्या लढतीत गुजरात जायंट्सवर 143 धावांनी विजय मिळवून दमदार सुऊवात केल्यानंतर मुंबई इंडियन्सने मंगळवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर अष्टपैलू प्रदर्शनासह पुन्हा एकदा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पाच सामन्यांमध्ये चौथ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागलेल्या आणि पाच संघांच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असलेल्या गुजरात जायंट्सला 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 षटकांत 9 बाद 107 धावाच काढता आल्या.
हेली मॅथ्यूजने फलंदाजीतील अपयशाची भरपाई करताना 4 षटकांत 24 धावा देऊन 3 बळी टिपले, तर लेगस्पिनर अॅमेलिया केरने 18 धावांत 2 बळी मिळवून मुंबईचा आणखी एक प्रभावी विजय निश्चित केला. मुंबईसाठी नॅट सिव्हर-ब्रंटनेही अष्टपैलू कामगिरी केली. तिने 31 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह महत्त्वपूर्ण 36 धावा काढल्या आणि नंतर 4 षटकांत 21 धावा देऊन 3 बळी मिळविले. मुंबईच्या संघातून खेळणाऱ्या प्रत्येक परदेशी गोलंदाजाने बळी घेतले, तर भारताच्या सायका इशाकला एकही बळी मिळू शकला नाही.
प्रथम फलंदाजी करण्यास सांगितल्यानंतर मुंबई इंडियन्सने 10 षटकांत 1 बाद 64 धावा काढल्या. त्यामुळे त्यांचा डाव स्थिर दिसला, तरी मोठ्या धावसंख्येची खात्री दिसत नव्हती. तथापि, कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावा फटकावल्या. तिच्या धडाक्यामुळे मुंबई इंडियन्सला 8 बाद 162 पर्यंत मजल मारता आली. याशिवाय यास्तिका भाटिया (44) आणि सिव्हर-ब्रंट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भर घातली. 50 धावा झळकल्यानंतर मुंबई इंडियन्सने आक्रमक मार्ग पत्करत शेवटच्या 10 षटकांत 98 धावा जोडल्या.
त्यानंतर दुसऱ्या सत्रात मुंबई इंडियन्सच्या सिव्हर-ब्रंटने पहिल्याच चेंडूवर सोफी डंकलीला पायचीत करून जबरदस्त सुऊवात केली. सभिनेनी मेघनाने सुऊवातीला काही चौकार फटकावत हरलीन देओलसह 21 धावांची भागीदारी केली. पण सहाव्या षटकात हेली मॅथ्यूजने मेघनाला बाद करू ही जोडी फोडली. मॅथ्यूजने तीन चेंडूंनंतर अॅनाबेल सदरलँडला शून्यावर बाद करून पॉवर प्लेच्या अखेरीस गुजरातची अवस्था 3 बाद 34 अशी करून टाकली.
त्यानंतर नियमित अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने गुजरातचा संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही. गुजरात जायंट्ससाठी कर्णधार स्नेह राणाने 19 चेंडूंत 20 धावा काढून ही पडझड थोड्या काळासाठी थांबवली असली, तरी त्याचा फारसा उपयोग झाला नाही. दरम्यान, मुंबई इंडियन्सची मॅथ्यूज (9 बळी) आता दिल्ली कॅपिटल्सच्या शिखा पांडे (8) आणि यूपी वॉरियर्सच्या सोफी एक्लेस्टोन (8) यांना मागे टाकत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 8 बाद 162 (यास्तिका भाटिया 44, नॅट सिव्हर 36, हरमनप्रीत कौर 51, गार्डनर 3-34, गार्थ 1-31, राणा 1-17, कन्वर 1-32) गुजरात जायंट्स 9 बाद 107 (मेघना 16, हरलीन देओल 22, स्नेहा राणा 20, सुषमा वर्मा नाबाद 18, सिव्हर 3-21, वाँग 1-19, मॅथ्यूज 3-23, केर 2-18).









