बेंगळूर : 2025 च्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेत शुक्रवारी येथे माजी विजेता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीमध्ये दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला असल्याने आता शुक्रवारच्या सामन्यात मुंबईचा संघ या मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी सज्ज झाला आहे. चालू महिन्याच्या प्रारंभी बडोदामध्ये झालेल्या चार सामन्यांपैकी एका सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून हार पत्करावी लागली होती. कर्णधार हरमनप्रित कौरच्या मनामध्ये यामागील पराभवाचा बदला घेण्याचे विचार येत आहेत. या एकमेव पराभवानंतर मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने जिंकून आपली विजय घोडदौड कायम राखली आहे.
मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 5 गड्यांनी, त्यानंतर आरसीबीचा 4 गड्यांनी आणि युपी वॉरियर्सचा 8 गड्यांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सचे खेळाडू सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहेत. स्पर्धेच्या गुणतक्त्यात मुंबई इंडियन्सचा संघ 4 सामन्यातून 6 गुणांसह आघाडीवर असून दिल्ली कॅपिटल्स 5 सामन्यांतून 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई संघातील नॅट सिव्हेर ब्रंट ही सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तिने 4 सामन्यांतून 254 धावा जमविल्या असून त्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. कर्णधार हरमनप्रितसिंग कौरने एकमेव अर्धशतक झळकविले असले तरी तिला फलंदाजीचा सूर मिळाल्याचे दिसते. हिली मॅथ्यूजला पुन्हा सूर मिळाल्याचे जाणवते. विंडीजच्या मॅथ्यूजने युपी वॉरियर्स विरुद्धच्या झालेल्या शेवटच्या सामन्यात 50 चेंडूत 69 धावा जमविल्याने मुंबई इंडियन्सने हा सामना 8 गड्यांनी जिंकला होता. मात्र यष्टीरक्षक आणि फलंदाज यास्तीका भाटिया फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी अद्याप झगडत आहे.
मंबई इंडियन्स संघ: हरमनप्रित कौर (कर्णधार), भाटिया, डी. क्लर्क, एस. गुप्ता, सायका इशाकी, शबनीम इस्माईल, जे. कलिता, कमलिनी, अमनदीप कौर, अमनजोत कौर, एस. कीर्तना, अॅमेलिया केर, ए. माहेश्वरी, हिली मॅथ्युज, एस. सजना, नॅट सिव्हर ब्रंट, पी. सिसोदीया आणि ट्रायॉन
दिल्ली कॅपिटल्स: मेग लेनिंग (कर्णधार), रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह दीप्ती, अॅलीसी कॅप्से, सदरलँड, अरुंधती रे•ाr, जेस जोनासेन, कॅप, मिनु मणी, एन. चेरानी, निकी प्रसाद, राधा यादव, शिखा पांडे, नंदिनी कश्यप, तानिया भाटिया, सारा ब्रिसे आणि तितास साधू
सामन्याची वेळ सायंकाळी 7.30 वाजता









