वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज मंगळवारी येथे दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ यावेळी आपला पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी प्रयत्नरत राहताना त्यांना भारतीय खेळाडूंकडून अधिक अपेक्षा असतील. अत्यंत स्पर्धात्मक अशा या लीगमध्ये भारतीय खेळाडूंच्या हातून अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्यास संघांना सातत्य राखणे अत्यंत अवघड जाते आणि दोन्ही बाजूंना नेमका याच गोष्टीचा त्रास सध्या होत आहे.
तिन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावे लागल्याने दिल्लीला गुणतालिकेवर खाते खोलता आलेले नाही, तर नेहमी संथ सुरुवात करण्यासाठी विख्यात असलेल्या मुंबईला दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावे लागले आहेत. दोन्ही संघांना सर्व विभागांतील आपले प्रदर्शन सुधारावे लागेल. मागील सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांची वरची फळी पार कोसळली. त्यामुळे पृथ्वी शॉच्या वेगवान गोलंदाजीला सामोरे जाण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच्या तांत्रिक समस्यांचे त्वरित निराकरण होईल असे वाटत नाही.
एका बाजूने फलंदाज झपाट्याने परतत असताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरने धावा जमविलेल्या आहेत. पण त्या 117 च्या स्ट्राइक रेटने नोंदविल्या गेल्या आहेत. त्याच्याकडून यापेक्षा चांगली कामगिरी अपेक्षित आहे. लग्नासाठी मायदेशी गेलेल्या मिचेल मार्शच्या अनुपस्थितीमुळे संधी मिळालेला मनीष पांडे फक्त एक चेंडू टिकला. आता ती कसर भरून काढून कोटला मैदानावर प्रभाव पाडण्यास तो उत्सुक असेल. अॅनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार आणि खलील अहमद यांच्यासह दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांना प्रतिस्पर्ध्यांनी झोडपलेले असून मुंबईविऊद्ध या समस्येचे त्यांना निराकरण करावे लागेल.
सुऊवातीच्या सामन्यात येथे वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून भरपूर साहाय्य मिळाले होते आणि दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांसाठी परिस्थिती पुन्हा अनुकूल ठरू शकते. मात्र राजस्थान रॉयल्सविऊद्धच्या सामन्यात दुखापत झालेल्या खलीलच्या तंदुरुस्तीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फिरकी विभागात कुलदीप यादव किफायतशीर ठरलेला आहे, पण मधल्या षटकांमध्ये संघाला त्याच्याकडून अधिक अपेक्षा असतील, तर अक्षर पटेल महागडा ठरलेला आहे.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या स्फोटक वरच्या फळीने निराशा केलेली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध कर्णधार रोहित शर्मा चांगला फॉर्ममध्ये दिसत होता. पण तुषार देशपांडेच्या एका अप्रतिम चेंडून त्याला परत पाठवले. मोठी रक्कम मोजून करारबद्ध करण्यात आलेल्या कॅमेरॉन ग्रीनला अजून प्रभाव पाडता आलेला नसून इशान किशनकडूनही विशेष खेळीचा अपेक्षा आहे. जेव्हा एखादा फलंदाज फॉर्ममध्ये नसतो तेव्हा तो नवनवीन प्रकारे बाद होत असतो आणि हेच स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवच्या बाबतीत घडत आहे. आज त्याची अनपेक्षित अपयशी वाटचाल संपण्याची आशा संघ बाळगून असेल. मुंबईची फलंदाजी हवी तशी चमकत नसताना तरुण तिलक वर्माची कामगिरी मात्र त्यात प्रत्येक वेळी उठून दिसली आहे. सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून









