वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू शार्दूल ठाकुरच्या शानदार कामगिरीच्या जोरावर तसेच शिवम दुबेच्या आक्रमक शतकामुळे मुंबई संघाने आसामचा एक डाव आणि 80 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने हा सामना दोन दिवसांमध्ये जिंकला.
मुंबई संघाने आतापर्यंत 41 वेळेला रणजी करंडक जिंकला आहे. 2024 च्या रणजी हंगामात मुंबईने आतापर्यंत आपल्या ब गटातून 5 सामने जिंकले असून त्यापैकी 4 सामने बोनस गुणासह जिंकले आहेत. या गटात मुंबईचा संघ 37 गुणासह पहिल्या स्थानावर आहे.
या सामन्यामध्ये अष्टपैलू शार्दुल ठाकुरने पहिल्या डावात 31 धावात 4 तर दुसऱ्या डावात 21 धावात 6 गडी असे एकूण सामन्यात 10 बळी मिळविले आहेत. आसामचा दुसरा डाव 33 षटकात 108 धावात आटोपला. मात्र मुंबईला उत्तरप्रदेश विरुद्धच्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. मुंबईने आतापर्यंत या रणजी हंगामात सात सामने खेळले असून एकमेव सामना गमविला आहे. आंध्रप्रदेशने या गटातून 25 गुणासह दुसरे स्थान मिळविले आहे. आसाम विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी शिवम दुबेने 5 षटकार आणि 11 चौकारांसह 140 चेंडूत 121 धावा झळकविल्या. या रणजी स्पर्धेतील दुबेचे हे दुसरे शतक आहे. तसेच त्याने दोन अर्धशतके नोंदविली आहेत. मुंबईने पहिल्या डावात 272 धावा जमवित आसामवर पहिल्या डावात 188 धावांची आघाडी मिळविली होती. आसामच्या दुसऱ्या डावात मोहीत अवस्थीने 10 धावात 2 तर तुषार देशपांडेने 37 धावात 2 तर कोटियानने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : आसाम प. डाव 84, मुंबई प. डाव 272, आसाम दु. डाव 108.









