वृत्तसंस्था/ मुंबई
विद्यमान रणजी करंडक विजेते मुंबई व हरियाणा यांच्यातील उपांत्यपूर्व लढत बीसीसीआयने काही अपरिहार्य कारणास्तव लाहिलीहून कोलकात्याला हलविण्यात आल्याचे सांगितले. 8 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत पाच दिवसांच्या उपांत्यपूर्व लढती होणार आहेत.
स्थळ बदलण्याचे कारण देण्यात आलेले नसले तरी उत्तर विभागात थंडीचे प्रमाण कमी होत असल्याने सकाळच्या वेळी लाहिलीमध्ये धुक्यासारखी अडचण निर्माण होऊ शकते, त्याचा परिणाम कामकाजावर होऊ शकतो, हे त्यामागचे कारण असल्याचे मानले जात आहे. ‘बीसीसीआयने आमच्याशी संपर्क साधला असून आम्हाला मुंबईविरुद्धचा उपांत्यपूर्व सामना ईडन गार्डन्सवर खेळविला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे,’ असे एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले. 42 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई संघात सूर्यकुमार यादव, अष्टपैलू शिवम दुबे, शार्दुल ठाकुर, कर्णधार अजिंक्य रहाणे यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. हरियाणा संघात वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज हाच त्यांचा आघाडीचा खेळाडू आहे. अन्य तीन उपांत्यपूर्व सामने सौराष्ट्र व गुजरात (राजकोट), विदर्भ व तामिळनाडू (नागपूर), जम्मू-काश्मिर व केरळ (पुणे) यांच्यात होणार आहेत.









