वृत्तसंस्था /अहमदाबाद
2023 च्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील विविध ठिकाणी झालेल्या सामन्यात हरियाणा संघाने उत्तराखंडचा सहा गड्यांनी पराभव केला. मुंबईने सिक्कीमवर सात गड्यांनी तर केरळने सौराष्ट्रवर तीन गड्यांनी विजय मिळविला. झारखंडने महाराष्ट्रचा सहा गड्यांनी पराभव केला. कर्नाटकाने जम्मू-काश्मिरवर मात केली. हरियाणा आणि उत्तराखंड यांच्यातील सामन्यात हरियाणा संघातील फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने 26 धावात 6 गाडी बाद केले. क गटातील या सामन्यात उत्तराखंडचा डाव 207 धावात आटोपला. त्यानंतर हरियाणाने दर्जेदार कामगिरी करत चार गड्यांच्या मोबदल्यात मोठा विजय नोंदविला. हरियाणातर्फे युवराज सिंगने 68, अंकित कुमारने 49, कर्णधार अशोक मिनारीयाने नाबाद 44 धावांचे योगदान दिले.
अ गटातील एका सामन्यात केरळने सौराष्ट्रवर तीन गड्यांनी विजय मिळविला. सौराष्ट्रतर्फे व्ही. जडेजाची 98 धावांची खेळी वाया गेली. केरळतर्फे अखिनने 4 गडी बाद केले. त्यानंतर केरळने 14 चेंडू बाकी ठेऊन 7 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. अ गटातील अन्य एका सामन्यात मुंबईने सिक्किमचा 7 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सिक्किमचा डाव 89 धावात आटोपला. मुंबईच्या तुषार देशपांडेने 19 धावात 3 गडी बाद केले. क गटातील अन्य एका सामन्यात दिल्लीने बिहारचा पराभव केला. या सामन्यात दिल्लीच्या इशान शर्माने 3 तर हर्षित राणाने 4 गडी बाद केले. बिहारचा डाव 149 धावात आटोपला. त्यानंतर दिल्लीने हा सामना एकतर्फी जिंकला. अहमदाबादमध्ये झालेल्या क गटातील सामन्यात कर्नाटकाने जम्मू-काश्मिरचा 222 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकाने 2 बाद 402 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या मयांक अगरवाल आणि रवीकुमार समर्थ यांनी शानदार शतके झळकाविली. समर्थने 123 तर अगरवालने 157, देवदत्त पडिकलने 71 धावा झोडपल्या. त्यानंतर जम्मू-काश्मिरचा डाव 180 धावात आटोपला.









