आयपीएल 16 : फॉर्मात आलेल्या मुंबई इंडियन्ससमोर गुजरात टायटन्सची सत्त्वपरीक्षा, मुंबई अंतिम फेरी गाठण्यास सज्ज

वृत्तसंस्था /अहमदाबाद
लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध ‘एलिमिनेटर’मध्ये गोलंदाज आकाश मधवालने केलेल्या चित्तथरारक कामगिरीमुळे पाच वेळा आयपीएल विजेते राहिलेल्या मुंबई इंडियन्सचा उत्साह आणि आत्मविश्वास कमालीचा वाढलेला असून आज शुक्रवारी येथे जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमवरील दुसऱ्या ‘क्वालिफायर’मध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना करताना त्यांना याचा भरपूर फायदा होणार आहे. बुधवारी रात्री चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर मधवालच्या 5 धावांत 5 बळी या जादुई आकड्यांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 81 धावांनी विजय मिळवत लखनौला अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढले. मुंबईचा हा मोठा विजय प्रतिस्पर्ध्यांना एक इशारा देऊन गेला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व जोफ्रा आर्चर तसेच फलंदाजीतील मुख्य आधार तिलक वर्मा यांच्या अनुपस्थितीतही ते परिस्थितीनुसार आपला खेळ उंचावू शकतात, हे सदर सामन्याने दाखवून दिले आहे. जेव्हा जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा तेव्हा मुंबई इंडियन्स संघ उसळी घेऊन त्यातून बाहेर सरलेला आहे. संपूर्ण हंगामात त्यांनी हे करून दाखविले आहे. मागील वर्षाच्या स्पर्धेत शेवटच्या स्थानावर राहिल्यानंतर रोहित शर्माच्या संघाने या हंगामात मर्यादित संसाधने असूनही मोठी मजल मारली असून आता ते सहावे आयपीएल विजेतेपद मिळविण्याच्या दृष्टीने सज्ज झाले आहेत. त्यांच्या कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि टीम डेव्हिड या खेळाडूंनी आव्हाने चांगल्या प्रकारे पेलली आहेत आणि आता युवा नेहाल वढेरानेही जबरदस्त प्रभाव टाकल्यामुळे फलंदाजी भक्कम बनली आहे. शिवाय रोहित शर्मा आणि इशान किशन ही सलामीची जोडीही चांगली कामगिरी करत आहे. .

मोहम्मद शमीच्या (15 सामन्यांत 26 बळी) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीचा यावेळी कस लागेल. कारण मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीने स्पर्धेच्या शेवटी कमालीची सुधारणा केलेली आहे. लखनौविरुद्ध मधवालने 3.3-0-5-5 असा स्वप्नवत स्पेल टाकून एक प्रकारे मुंबईला उपांत्य फेरीत पोहोचविले. त्याच्याशिवाय अनुभवी पीयूष चावला (15 सामन्यांत 21 बळी) आणि जेसन बेहरेनडॉर्फ (11 सामन्यात 14 बळी) हे देखील प्रभावी ठरले आहेत, तर महाग ठरलेल्या ख्रिस जॉर्डननेही एलिमिनेटरमध्ये 2-1-7-1 अशी चांगली गोलंदाजी केली. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या गुजरात टायटन्ससाठी दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने ही शेवटची संधी आहे. मागील काही सामन्यांमध्ये त्यांच्या शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी मोठ्या प्रमाणात फटकेबाजी केलेली असली, तरी त्यांची सारी फळी चमकणे अत्यावश्यक आहे. चेन्नईविरुद्ध गिलचा दिवस चांगला राहिलेला नसला, तरी साखळी फेरीच्या शेवटच्या टप्प्यात त्याने केलेल्या दोन शतकांमुळे तो मुंबई इंडियन्ससाठी सर्वांत मोठा धोका राहील. गिलने 15 सामन्यांत 55.53 च्या सरासरीने दोन शतके आणि चार अर्धशतकांसह 722 धावा केलेल्या आहेत. गुजरात टायटन्सचा दुसऱ्या क्रमांकावरील फलंदाज विजय शंकरपेक्षा (12 सामन्यांतून 301 धावा) त्याने 421 धावा जास्त केलेल्या आहेत. गुजरात टायटन्सला कर्णधार हार्दिक पंड्याकडून फलंदाजीत अधिक अपेक्षा असतील. मागील पाच सामन्यांमध्ये त्याची कामगिरी 8, एकदा फलंदाजीस उतरला नाही, 8, 4 आणि 25 धावा अशी राहिलेली आहे. टायटन्सचा मधल्या फळीत शेवटी येणारा फटकेबाज डेव्हिड मिलर हा या मोसमात एक अर्धशतकही झळकावू शकलेला नसून मागील तीन सामन्यांमध्ये तो दुहेरी आकड्यातील धावसंख्या नोंदविण्यातही अपयशी ठरलेला आहे. शुक्रवारी होणारी लढत हा या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील तिसरा सामना असेल.

गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशिद खान, राहुल तेवातिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नळकांडे, जयंत यादव, आर. साई किशोर, नूर अहमद, दसून शनाका, ओडियन स्मिथ, के. एस. भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशुआ लिटल आणि मोहित शर्मा.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस जॉर्डन, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, पीयूष चावला, टिम डेव्हिड, राघव गोयल, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन, डुआन जान्सेन, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, रमणदीप सिंग, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, ट्रिस्टन स्टब्स, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहाल वढेरा, सूर्यकुमार यादव.









