रायगड,प्रतिनिधी
कोकणातील गणेशोत्सव सणाला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असल्याने कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या खासगी वाहनाने तसेच एसटी महामंडळाच्या बसने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करणार आहेत.सुमारे ५ पाच लाखांपेक्षा अधिक गणेश भक्त मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जात असल्याने, गणेश भक्तांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर महामार्ग पोलीस सज्ज झाले आहेत.
कोकणातील गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात वाहतूक कोंडीचा व्यत्यय टाळण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखा सज्ज झाली आहे. पळस्पे फाटा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप या ४५०किमी अंतरापर्यंत महामार्ग सुरक्षा गस्त पथकातील १९ अधिकारी आणि २३६ वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
गणपती सणासाठी गुजरातपासून मुंबई ते पुण्यापासून चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून येणार आहेत.रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे गणेशभक्त मागील दहा वर्षापासून मुंबई-पुणे-कोल्हापूर या मार्गाचा वापर करीत होते .यंदा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बहुतांशी ठिकाणी अंतिम टप्प्यात आल्याने व महामार्ग बऱ्यापैकी सुस्थितीत असल्याने चालू वर्षी महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर पळस्पे पाट्यापासून इंदापूर पर्यंतच्या एकेरी रस्त्याचे काम करण्यात आल्याने या मार्गावरून एकेरी वाहतूक चालू होणार आहे.त्यामुळे मुंबई,पुणे,गुजरात मधून कोकणात गणेशोत्सवाच्या काळात गावी जाणारे चाकरमानी आपली वाहने याच मार्गावरून प्रवास करणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील माणगाव,इंदापूर आणि कोलाड ,लोणेरा फाटा या ठिकाणी दरवर्षी वाहतूक कोंडी होते .यावर्षी देखील कोंडी निर्माण झाल्यास प्रशासन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यशस्वी होईल का हा प्रश्न आज ही कायम आहे. कारण माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणचा बाय पास रोड अद्याप झालेला नाही.त्याचबरोबर महाड तालुक्यातील दासगाव खिंडीचे काम अपुर्ण आहे. तसेच महाड शहरा नजीक साहिल नगर या ठिकाणी देखील काम अपुर्ण आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड भरणा नाका,चिपळूण शहरा जवळील बहादूर शेख नाका या दोन ठिकाणी देखील वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते माणगाव हा मार्ग अरुंद असल्याने अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे .पनवेल पळस्पे फाटा ते कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत वाहतूक पोलीस शाखेच्या पळस्पेत सात शाखा असून यामध्ये फाटा वाकण, महाड,कशेडी,चिपळूण,हातखंबा ,कसाल या ठिकाणी निवडणुका करण्यात आले आहेत . या सात ठिकाणी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी वाहतूक शाखेतील १९ अधिकारी आणि २३६ वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.त्याच बरोबर एखादा अपघात झाला तर जखमीसाठी रुग्ण वाहिका तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत.
महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रात व संभाव्य वाहतूक कोंडीच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले कर्मचारी रात्र दिवस मोटरसायकल ने पेट्रोलिंग करणार आहेत. त्या मुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार असला तरी खड्ड्यातून मात्र चाकरमान्यांची सुटका होणार नाही हे वास्तव नाकारता येत नाही .
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांनी शक्यता सुरक्षते च्या दृष्टीने दिवसाचा प्रवास करावा.वेग मर्यादेवर नियं त्रण ठेऊन वाहन चालवावे.वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.प्रवासात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाल्यास जवळच असलेल्या वाहतूक शाखेत संपर्क साधावा किंवा अडचणीच्या परस्थिती मध्ये ११२ नंबर वर संपर्क साधावा.संजय भोसले,पोलीस उप निरीक्षक महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांना आवाहन केले आहे.









