रायगड, प्रतिनिधी
महाड ( जि. रायगड) शहरा पासुन एक किलो मिटर अतरावर असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर गांधारपाले गावच्या हद्दीत भरधाव ट्रकने टेम्पोला दिलेल्या धडकेत टेम्पोचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात १३ सप्टेंबर रोजी रात्री २ च्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मौजे गांधारपाले हद्दीत आयशर टेम्पो वरील चालक वैभव राजाराम बेनकर (वय- 32 राहणार रत्नागिरी) हा गोवा बाजूकडून मुंबईकडे जात असताना मौजे गांधारपाले येथे अचानक समोरून मुंबईकडून गोवा दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पोचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याचा सहकारी मनीष शामसुंदर मस्के ( वय- 32 राहणार संगमेश्वर) हा जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून, टेम्पोचालकाला महामार्ग पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने अथक प्रयत्ना नंतर टेम्पोतून बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालय महाड येथे पाठवण्यात आले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
यामध्ये अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाणे मार्फत सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना बंदी केल्यानंतर उशिरा रात्री ही अवजड वाहने प्रवास करत असतात. महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे. दिशादर्शक फलक आणि धोकादायक वळणे रात्री नीट दिसत नसल्यामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या महामार्ग विभागाने यावर काटेकर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.