आयपीएल साखळी सामना : शेवटच्या चेंडूवर रोमांचक चौकारासह धोनीने विजयाचा घास हिसकावला! मुंबई इंडियन्सचा सलग सातवा पराभव! स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात

मुंबई / वृत्तसंस्था
जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर असा लौकिक असणाऱया महेंद्रसिंग धोनीने ‘टायगर अभी जिंदा है’ हाच नारा आयपीएल साखळी सामन्यात आणखी एकदा दिला आणि त्याच्या शेवटच्या चेंडूवरील चौकारामुळे मुंबईचे स्पर्धेतील आव्हान जवळपास फिनिश झाले! मुंबईला 7 बाद 155 धावांवर रोखल्यानंतर चेन्नईने 156 धावांचे आव्हान धोनीच्या चौकारामुळे शेवटच्या चेंडूवर पार केले! फिनिशर धोनी या लढतीत 13 चेंडूत 28 धावांवर नाबाद राहिला. मुंबईचा यंदाच्या आयपीएलमधील हा सलग सातवा पराभव असून यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

मुंबई इंडियन्सतर्फे डॅनिएल सॅम्सने 30 धावात 4 व जयदेव उनादकटने 2 बळी घेतले. पण, धोनीच्या निर्णायक फटकेबाजीमुळे मुंबईचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला गेला. संयम व एकाग्रतेचा उत्तम दाखला देत धोनीने आपल्या क्रिकेटिंग ब्रेनच्या बळावर चेन्नईला रोमांचक विजय संपादन करुन दिला.
प्रारंभी, मुकेश चौधरीने नव्या चेंडूवर भेदक मारा करत डावाला सुरुंग लावल्यानंतर मुंबई इंडियन्सला फक्त तिलक वर्माच्या संयमी अर्धशतकामुळे दीडशतकी टप्पा पार करता आला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा स्टार कर्णधार रोहित शर्मा व सहकारी सलामीवीर इशान किशन पहिल्याच षटकात अगदी खातेही उघडण्यापूर्वीच बाद झाले आणि इथूनच मुंबईच्या पडझडीला जोरदार सुरुवात झाली.
युवा गोलंदाज मुकेशने दुसऱया चेंडूवर रोहितला मिडऑनवरील सॅन्टनरकरवी झेलबाद केले तर पाचव्या चेंडूवर इशान किशन स्विंगिंग यॉर्करवर त्रिफळाचीत झाला. नंतर ब्रेविस (4) मुकेश चौधरीचे तिसरे सावज ठरला. ब्रेविसने आऊटसाईड ऑफ स्टम्प चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात धोनीकडे सोपा झेल दिला.
सूर्यकुमारने ड्राईव्हचा चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली. शिवाय, चौधरी व महीश तिक्षणा यांनाही एक चौकार फटकावला. पॉवर प्लेअखेर मुंबईची 3 बाद 42 अशी स्थिती होती. त्यानंतर सॅन्टनरने सूर्याला स्वीपच्या मोहात पाडले आणि लाँग-लेगवरील चौधरीने सोपा झेल टिपला. तिलक वर्मा व पदार्पणवीर ऋतिक शोकिन (25) यांनी पाचव्या गडय़ासाठी 41 धावांची भागीदारी साकारली. या जोडीने जडेजाच्या डावातील 11 व्या षटकात 13 धावा वसूल केल्या. यात तिलकचा स्लॉग स्वीपचा षटकार लक्षवेधी ठरला.
मुंबईने या सामन्यात आपला निम्मा संघ अवघ्या 85 धावांमध्येच गमावला. नंतर शोकिनने डेव्हॉन ब्रेव्होच्या (2-36) शॉर्ट बॉलवर मिडऑनवरील रॉबिन उत्थप्पाकडे सोपा झेल दिला. डॅनिएल सॅम्स व पोलार्ड स्वस्तात बाद झाल्यानंतर मुंबईचे आणखी हाल झाले. मात्र, तिलक व उनादकट यांनी 16 चेंडूत 35 धावांची जलद भागीदारी केल्याने या संघाला दीडशतकी टप्पा सर करता आला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : 20 षटकात 7 बाद 155 (तिलक वर्मा 43 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 51, सूर्यकुमार यादव 21 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 32, ऋतिक शौकिन 25 चेंडूत 3 चौकारांसह 25, केरॉन पोलार्ड 9 चेंडूत 14, जयदेव उनादकट 9 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 19. अवांतर 5. मुकेश चौधरी 3 षटकात 3-19, डेव्हॉन ब्रेव्हो 2-36, सॅन्टनर, तिक्षणा प्रत्येकी 1 बळी).
चेन्नई सुपरकिंग्स : 20 षटकात 7 बाद 156 (अम्बाती रायुडू 35 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह 40, रॉबिन उत्थप्पा 25 चेंडूत 30, महेंद्रसिंग धोनी 13 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 28, डेव्हॉन प्रिटोरियस 14 चेंडूत 22, ब्रेव्हो नाबाद 1. अवांतर 8. डॅनिएल सॅम्स 4 षटकात 4-30, उनादकट 2-48, रिले मेरेडिथ 1-25).
शेवटच्या षटकात 17 धावांचे रक्षण करण्यात उनादकटला अपयश

डावातील शेवटच्या षटकात 17 धावांची आवश्यकता असताना उनादकटने पहिल्याच चेंडूवर प्रिटोरियसला पायचीत करत उत्तम सुरुवात केली होती. पण, ब्रेव्होने दुसऱया चेंडूवर एकेरी धाव घेतल्यानंतर धोनी स्ट्राईकवर आला आणि इथून पुढे सामन्याचे सर्व चित्रच पालटून गेले! धोनीने तिसरा चेंडू लाँगऑफच्या दिशेने षटकारासाठी पिटाळून लावला तर चौथा चेंडू फाईन लेगकडे फ्लिक करत चौकार वसूल केला. उर्वरित 2 चेंडूत 6 धावांची आवश्यकता असताना धोनीने पाचव्या चेंडूवर मिडविकेटकडे फटका मारत 2 धावा घेतल्या आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज असे नवे समीकरण होते. धोनीचा फिनिशरचा लौकिक खोडून काढण्याच्या इराद्याने उनादकटचा लेग स्टम्पवरील चेंडू थेट टप्प्यात होता. पण, धोनीने शिताफीने बॅटची दिशा बदलत शॉर्ट फाईन लेगकडे चौकार वसूल केला आणि आपणच सर्वोत्तम फिनिशर असल्याचा पुन्हा एकदा सर्वोत्तम दाखला दिला!
रोहित शर्माचा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम!

एकीकडे, नामुष्कीजनक पराभवामुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात येत असताना या संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या खात्यावर आणखी एक नकोनकोसा विक्रम नोंदवला गेला. रोहित या लढतीत शून्यावर बाद झाला आणि आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर आली. रोहितने आयपीएलमध्ये खाते न उघडता बाद होण्याची ही 14 वी वेळ होती. रोहितने येथे या निकषावर पियुष चावला, हरभजन सिंग, मनदीप सिंग व पार्थिव पटेल यांचा विक्रम मोडीत काढला. हे चारही फलंदाज आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
चेन्नईकडून अर्धा डझनभर जीवदाने लाभूनही…
सॅन्टनरच्या डावातील दुसऱया षटकात धोनीने सूर्यकुमार यादवला यष्टीचीत करण्याची नामी संधी दवडल्यानंतर चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांनी मुंबईकरांना आणखी तब्बल 5 जीवदाने दिली. सॅन्टनरच्या चेंडूवर मिडऑफवरुन कव्हरकडे वळलेल्या जडेजाने ब्रेविसचा झेल सोडला तर पाचव्या षटकात पहिल्या स्लीपमधील ब्रेव्होने तिलक वर्माला जीवदान दिले. पुढे, 12 व्या षटकात जडेजाने एक्स्ट्रा कव्हरवर शौकिनला आणखी एक जीवदान दिले. इतके कमी नव्हते की काय म्हणून, 19 व्या षटकात प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर डीप पॉईंटवर दुबेने उनादकटचा झेल सोडला. अर्थात, ही अर्धा डझनभर जीवदाने लाभूनही मुंबईची गुणतालिकेत पाटी गुरुवारीही कोरीच राहिली!
धोनी-जडेजाचे खराब क्षेत्ररक्षण आणि अमित मिश्राचे ‘ते’ ट्वीट!
एरवी महेंद्रसिंग धोनीचे यष्टीरक्षण आणि रविंद्र जडेजाचे क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचे होते. पण, धोनीने सूर्यकुमारला यष्टीचीत करण्याची संधी गमावणे आणि जडेजाने दोन सोपे झेल सोडणे आश्चर्याचा धक्का देणारे ठरले. हाच धागा पकडत अमित मिश्राने केलेले ट्वीट बरेच व्हायरल झाले. आपल्या ट्वीटमध्ये अमित मिश्रा म्हणाला, ‘जडेजाने झेल सोडणे आणि धोनीने स्टम्पिंग चान्स गमावणे हे शाहिद आफ्रिदीने डोळे उघडे ठेवून शहाणपणाने फलंदाजी करण्यासारखे आहे’!









