सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धा : रहाणेचा पुन्हा धमाका, 98 धावांची वादळी खेळी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या 56 चेंडूत 98 धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर मुंबईने बडोद्याला 6 विकेट्सनी नमवले आणि फायनलमध्ये प्रवेश केला. रहाणेने 11 चौकार आणि 5 षटकारांसह मुंबईच्या विजयाचा पाया रचला. या सीझनमध्ये तिसऱ्यांदा अजिंक्य रहाणे शतक करण्यापासून हुकला आहे. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे आणि टी 20 कारकिर्दीतील 48 वे अर्धशतक होते. रहाणेच्या तडाखेबंद खेळीमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून निवडले गेले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दिल्लीला पराभूत करत मध्य प्रदेशने अंतिम फेरी गाठली आहे. आता, दि. 15 रोजी मुंबई व मध्य प्रदेश यांच्यात अंतिम सामना होईल.
एम. चिनास्वामी स्टेडियमवर झालेल्या लढतीत मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत बडोदा संघाला 158 धावांमध्येच रोखले. बडोद्याची भिस्त हार्दिक आणि कृणाल पंड्या या बंधूंवर होती. मात्र दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. कृणालने 30 तर हार्दिकने 5 धावांची खेळी केली. शिवालिक शर्माने (36) तर शाश्वत रावतने (33) धावा केल्या. स्पर्धेत आतापर्यंत दमदार खेळ करणाऱ्या बडोद्याला या सामन्यात मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
रहाणेचा धमाका, अय्यरचीही संयमी खेळी
या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाला. तो 8 धावा करुन तंबूत परतला. पण यानंतर अजिंक्य रहाणेला कर्णधार श्रेयस अय्यरची तोलामोलाची साथ मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. श्रेयस 30 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 3 षटकारांसह ही खेळी सजवली. श्रेयस बाद झाल्यानंतर रहाणेने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुंबईच्या या विजयाचा हिरो ठरला तो अजिंक्य रहाणे. त्याने 56 चेंडूत 98 धावांची तुफानी खेळी खेळली. या काळात त्याच्या बॅटमधून 11 चौकार आणि 3 षटकार आले. संघाला विजयासाठी दहा धावा करायच्या होत्या तेव्हा रहाणे 90 धावांवर खेळत होता. त्याने दोन चौकार मारून आपली धावसंख्या 98 वर नेली. दरम्यान अभिमन्यू सिंगच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. अवघ्या दोन धावांनी त्याचे शतक हुकले. पाठोपाठ सुर्यकुमार यादवही बाद झाला. त्याने सात चेंडूत एक धाव घेतली. यानंतर आलेल्या सुर्यांश शेडगने षटकार खेचत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबई हा सामना 6 गडी राखून जिंकला.
संक्षिप्त धावफलक
बडोदा 20 षटकांत 7 बाद 158 (शाश्वत रावत 33, कृणाल पंड्या 30, शिवालिक शर्मा नाबाद 36, सूर्यांश शेडगे 2 तर मोहित अवस्थी, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, तनुश कोटियन आणि अथर्व अंकोलेकर प्रत्येकी एक विकेट)
मुंबई 17.2 षटकांत 4 बाद 164 (अजिंक्य रहाणे 98, श्रेयस अय्यर 46, सूर्यांश शेडगे नाबाद 6, हार्दिक पंड्या, अतित शेठ, शाश्वत रावत व अभिमन्यूसिंग यांनी प्रत्येकी एक विकेट).
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत रहणेच्या सर्वाधिक धावा
यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या अजिंक्य रहाणेने बडोद्याविरुद्ध लढतीत 98 धावांची खेळी साकारत मुंबईला विजय मिळवून दिला. 98 धावांच्या महत्वपूर्ण खेळीसह तो सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यात 432 धावा केल्या आहेत. ही कामगिरी करताना त्याने बिहारच्या सकिबूल हसनला (353 धावा) मागे टाकले. आता, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रहाणेच्या नावे झाला आहे. याशिवाय, रहाणेने या स्पर्धेतील पाचवे अर्धशतक झळकावले. आतापर्यंत झालेल्या 8 पैकी पाच सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी साकारली आहे.
दिल्लीवर मात करून मध्य प्रदेश अंतिम फेरीत
बेंगळूर : सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात मध्य प्रदेशने दिल्लीवर 7 गड्यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावत 146 धावा केल्या. यानंतर मध्य प्रदेशने 15.4 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यातच विजयी आव्हान पूर्ण केले. कर्णधार रजत पाटीदारने 29 चेंडूत 4 चौकार व 6 षटकारासह नाबाद 66 धावांची खेळी करत मध्य प्रदेशच्या विजयात मोलाचे योगदान दिले.









