मेडिकल ड्रामा ‘मुंबई डायरीज’च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजीत दुबे, मृण्मयी देशपांडे, कोंकणा सेन, प्रकाश बेलावडी यासारखे कलाकार असणारी ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने केले असून त्यानेच याच्या निर्मितीची जबाबदारी पेलली आहे. मुंबईतील अतिवृष्टीच्या प्रसंगावर आधारित हा सीझन असणार आहे. अतिवृष्टीनंतर शहरवासीयांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत रुग्णालयातील कर्मचारीवर्ग याला कसा सामोरा जातो हे या सीरिजमध्ये दाखविण्यात आले आहे. मुंबई डायरीजच्या दुसऱ्या सीझनबद्दल मी अत्यंत उत्सुक आहे. डॉ. कौशिक ही भूमिका अत्यंत प्रभावित करणारी आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात माणूस कशाप्रकारे झगडत असतो हे ही भूमिका दर्शवत असल्याचे मोहित रैनाने सांगितले आहे.
‘मौत के आगे कोई क्लास, कोई कास्ट, कोई पॉलिटिक्स नहीं टिकती’ हा डायलॉग याच्या ट्रेलरमध्ये ऐकू येतो. मुंबई डायरीजचा पहिला सीजन 26/11 वर आधारित होता. पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. निर्मात्यांनी आता याचा नवा सीझन आणला आहे. ही सीरिज प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 6 ऑक्टोबरपासून पाहता येणार आहे.