वृत्तसंस्था/ रियाद (सौदी अरेबिया)
येथील किंग फहीद आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियमवर सोमवारी खेळविण्यात आलेला एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील मुंबई सिटी एफसी आणि अल जझिरा फुटबॉल क्लब यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.
सोमवारचा हा सामना शेवटपर्यंत अटीतटीचा झाला. दोन्ही संघातील आघाडीफळी आणि बचावफळीतील खेळाडूंची कामगिरी दर्जेदार आणि भक्कम झाल्याने शेवटपर्यंत गोलफलक कोराच राहिला. या अनिर्णित सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. या एकमेव गुणामुळे मुंबई सिटी एफसी संघाला या स्पर्धेच्या पुढील फेरीत स्थान मिळविण्याची आशा निर्माण झाली आहे. एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासामध्ये मुंबई सिटी एफसी या भारतीय फुटबॉल क्लबने सर्वाधिक गुण नोंदविण्याचा विक्रम केला आहे. गेल्यावर्षीच्या फुटबॉल हंगामात या स्पर्धेत एफसी गोवा संघाने नोंदविलेला तीन गुणांचा विक्रम मुंबई सिटी एफसीने मागे टाकला.
सोमवारच्या सामन्यातील पहिल्या 25 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर भर दिला होता. 30 व्या मिनिटाला अल जझिरा संघातील ब्रुनोने मारलेला फटका मुंबई सिटी संघाच्या गोलरक्षकाने थोपविला. उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल नोंदविता न आल्याने हा सामना अखेरीस गोलशून्य बरोबरीत राहिला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात मुंबई सिटी एफसी संघाने ब गटात 4 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. अल जझिरा क्लब दुसऱया स्थानावर आहे. आता येत्या शनिवारी मुंबई सिटी एफसी संघाचा ब गटातील पाचवा सामना अल शबाब संघाबरोबर होणार आहे.