क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
दोन गोलांच्या पिछाडीनंतर आक्रमक खेळ करताना मुंबई सिटी एफसीने चेन्नईन एफसीला 2-6 असे दारूण पराभवास सामोरे केले. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर म्हणजे त्यांच्या ‘होम’ लढतीत आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर चेन्नईन एफसीला मोठा पराभव स्वीकारावा लागला.
चेन्नईन एफसीसाठी पीटर स्लीस्कोव्हीच आणि खयातीने गोल केले तर मुंबई सिटी एफसीचे गोल जॉर्गे दियाझ, ग्रेग स्टीव्हर्ट, विनीत राय, विग्नेश दक्षिणमूर्ती, आल्बेर्तो नोगुएरा व बिपीन सिंगने गोल केले. या विजयाने मुंबई सिटीला 3 गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 6 सामन्यांतून प्रत्येकी तीन विजय व बरोबरीने 12 गुण झाले व त्यांनी गुणतालिकेत दुसऱया स्थानावर झेप घेतली. चेन्नईनचा हा दुसरा पराभव. त्यांचे दोन विजय व एका बरोबरीने 7 गुण कायम आहेत.
सामन्याच्या 19व्या मिनिटाला चेन्नईनच्या रहीम अलीच्या पासवर पीटर स्लीस्कोव्हीचने गोल करून आघाडी घेतली. त्यानंतर 32व्या मिनिटाला खयातीने दुसरा गोल करून चेन्नईनची आघाडी दोन गोलाने वाढविली. या गोलनंतर हा सामना ‘वन वे ट्रफ्रीक’ बनला. मुंबईने आक्रमक खेळ करताना दोन गोलांची पिछाडी तर भरून काढलीच व चेन्नईन एफसीवर आणखी चार गोल केले.
प्रथम ग्रेग स्टीव्हर्टच्या पासवर जॉर्गे परेरा दियाझने गोल केल्यानंतर ग्रेग स्टीव्हर्टने पॅनल्टीवर गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. त्यानंतर 16 मिनिटांच्या अंतरात मुंबई सिटीने तीन गोल केले. हे गोल विनीत राय, विग्नेश दक्षिणमूर्ती व आल्बेर्तो नोगुएया यांनी केले. सामन्याच्या 90व्या मिनिटाला बिपीन सिंगने मुंबई सिटीचा सहावा गोल केला.