वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत शनिवारी येथे यजमान चेन्नई सुपर किंग्ज् आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होत आहे. या स्पर्धेतील हा 49 वा सामना आहे. आतापर्यंत चार वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज्चा संघ पुन्हा आपली गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. त्याच प्रमाणे गेले सलग दोन सामने जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ आपली विजयी घौडदौड कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपय किंग्ज्ला या स्पर्धेतील गेल्या 3 सामन्यात केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी निश्चितच दर्जेदार असल्याने तसेच त्यांना गेल्या दोन सामन्यातील विजयानंतर आत्मविश्वास बळावल्याने चेन्नई संघाला शनिवारच्या सामन्यात अधिक जागृक रहावे लागेल. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पाचवेळा अजिंक्यपद मिळविले आहे. 2019 साली चेन्नईच्या या मैदानावर झालेले शेवटचे दोन सामने मुंबईने पाठोपाठ जिंकले होते. जवळपास 4 वर्षानंतर चेन्नई आणि मुंबई या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये घरच्या मैदानावर पहिल्यांदाच लढत होत आहे. 30 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज्ला शेवटच्या चेंडूवर पंजाब किंग्ज्कडून पराभव पत्करावा लागला होता. आता चेन्नईच्या संघाला शनिवारच्या सामन्यात आपल्या नशिबाची पारख करावी लागेल. चेन्नई संघातील देवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांच्या फलंदाजीत सातत्य दिसत आहे. कॉन्वेने आतापर्यत 414 तर गायकवाडने 354 धावा जमविल्या आहेत. अनुभवी अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांची फलंदाजी बहरत असल्याने चेन्नईला शनिवारच्या सामन्यात मोठी धावसंख्या रचता येईल. पण अंबाती रायडू आणि मोईन अली यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा चेन्नई बाळगत आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा हा शनिवारच्या सामन्यात चमत्कार करु शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईमध्ये झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या दमदार फलंदाजीमुळे चेन्नईने विजय नोंदविला होता. दीपक चहर, तुषार देशपांडे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेश तिक्ष्णा हे चेन्नई संघातील प्रमुख गोलंदाज आहेत.
2023 च्या आयपीएल हंगामात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाची पहिल्या काही सामन्यातील कामगिरी अत्यंत निकृष्ट झाली होती. पण या संघाने अलिकडच्या गेल्या काही सामन्यात 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग यशस्वीपणे करत विजय नोंदविला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आर्चरच्या संघातील आगमनामुळे मुंबईची गोलंदाजी थोडी भक्कम झाल्याची जाणवते. बेरेनडॉर्फ, पियूश चावला, जेनसन, कुमार कार्तिकेय यांच्याकडून आर्चरला साथ मिळणे गरजेचे आहे. पूर्वाश्रमीची चेपॉक तर सध्याच्या चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजीलाही अनुकूल राहिल. त्यामुळे शनिवारच्या सामन्यात दोन्ही संघ भक्कम फलंदाजी करण्यासाठी प्रयत्न करतील. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात चेन्नई सुपर किंग्ज्ने 11 गुण तर मुंबई इंडियन्सने 10 गुण नोंदविले आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याकरीता शनिवारच्या सामन्यात हे दोन्ही संघ विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झगडतील.
संघ – चेन्नई सुपर किंग्ज : धोनी (कर्णधार), आकाशसिंग, मोईन अली, भगत वर्मा, दीपक चहर, कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रविंद्र जडेजा, मगाला, अजय मंडल, पथिराना, प्रेटोरियस, अजिंक्य रहाणे, शेख रशिद, अंबाती रायडू, सँटनर, एस. सेनापती, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, स्टोक्स.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आर्चर, अर्शद खान, बेहरेनडॉर्फ, ब्रेव्हिस, पीयूष चावला, डेव्हिड, राघव गोयल, कॅमेरगॅन ग्रीन, इशान किशन, ड्युएन, जान्सेन, जॉर्डन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, मेरेडिथ, मुलानी, रमनदीप सिंग, संदीप वॉरियर, शोकिन, स्टब्ज, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, विष्णू विनोद, वधेरा आणि सूर्यकुमार यादव.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वाजता.









