Mumbai Businessman Murder Case : ठाणे येथील व्यापारी कीर्तीकुमार कोठारी यांच्या खूनाचा कट हा त्रिमूर्ती ज्वेलर्स या दुकानात शिजल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. कोठारी ही मालदार पार्टी असून त्यांचा खून करायच़ा तसेच त्यांच्याकडील लाखो रूपयांचे सोने-चांदी व रोकड तिघांत वाटून घ्यायची अशी डिल संशयित आरोपींमध्ये झाली. खूनाच्या कटाची सर्व तयारी ही त्रिमूर्ती ज्वेलर्समध्येच करण्यात आली होती, हे आता पोलीस तपासामध्ये उघड होत आहे. पोलीस कोठडीत असलेल्या भूषण खेडेकर याला सोमवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े यावेळी न्यायालयाने भूषणला न्यायालयीन कोठडी सुनावली.
नेमके काय घडले
१९ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सोन-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले कीर्तीकुमार कोठारी यांचा शहरातील त्रिमूर्ती ज्वलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (वय ४२ रा. खालची आळी रत्नागिरी), रिक्षा चालक महेश मंगलपसाद चौगुले ( वय ३९ रा. मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (वय ३६ रा भाटे खोतवाडी) यांना अटक केली आहे.
कोठारी यांचा खून केल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी तिन्ही संशयितांनी मृतदेह आबलोलीतील जंगलमय परिसरात असलेल्या पऱ्यामध्ये फेकून देण्यात आला. भूषण खेडेकर, महेश चौगुले व फरीद होडेकर या तिघांमध्ये मैत्री होती. तिघेही कमी अधिक प्रमाणात पैशाच्या अडचणीत होते. कोठारी यांच्या खूनाच्या काही दिवसांपूर्वी भूषणने उधारीचे पैसे न दिल्याने दमदाटी करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे.महेश व फरीद हे गोखले नाका परिसरात असलेल्या भूषण खेडेकर याच्या त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात एकत्र जमत असत. यावेळी भूषण याने आपण आर्थिक अडचणीत असल्याचे दोघांनाही सांगितले होते.
दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील सराफ व्यापारी कोठारी हे रत्नागिरीत येणार असल्याचे भूषण याने आपल्या मित्रांना सांगितले. कोठारी हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असून ते गेले अनेक वर्ष सोने-चांदीचा व्यवसाय करतात त्यामुळे रत्नागिरीत येताना कोठारी हे लाखोंचा ऐवज आपल्या सोबत आणतील असा कयास भूषण याने लावला होता. पैशाची अडचण दूर करण्यासाठी कोठारींचा काटा काढायचा असा कट भूषणने तयार केला यासाठी त्याने महेश व फरीद यांना पैशाचे आमिष दाखवून खूनासाठी तयार केले, अशी माहिती तपासामध्ये समोर आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
Previous Articleफुलांच्या उधळणीत दौडचे स्वागत
Next Article येळ्ळूर येथे दुर्गा दौडमुळे शिवमय वातावरण









