प्रवाशांच्या संतापानंतर पर्यायी विमानाची सोय
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावहून मुंबईला जाणारे विमान उड्डाणानंतर पुन्हा बेळगावला आणण्याची घटना शनिवारी सकाळी घडली. विमानामध्ये दोष आढळल्याने संबंधित पायलटने ते विमान दुरुस्तीसाठी पुन्हा बेळगावला आणले. परंतु, यामध्ये प्रवाशांची गैरसोय झाली. विमान कंपनीने प्रवाशांसाठी दुपारी अडीचनंतर पर्यायी विमानाची व्यवस्था करून दिली.
शनिवारी सकाळी 7.30 वाजता स्टार एअरचे विमान प्रवाशांना घेऊन बेळगावहून मुंबईला निघाले. विमान उड्डाण झाल्यानंतर अर्ध्या तासाने विमानामध्ये तांत्रिक दोष असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ बेळगाव विमानतळाशी संपर्क साधून विमान माघारी आणण्याची परवानगी मागितली. बेळगाव विमानतळाने परवानगी देताच 8.30 च्या सुमारास विमान पुन्हा बेळगावला आणण्यात आले. विमानामध्ये तांत्रिक दोष असल्याचे सांगून हे लँडींग करण्यात आले.
स्टार एअर विमान कंपनीचा बेळगावमध्ये इंजिनिअरिंग विभाग असल्याने, तसेच या ठिकाणी विमानांचे नाईट लँडींग होत असल्याने स्टार एअरने विमान बेळगावला आणण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक दोष दूर करण्यास विलंब झाल्याने काही प्रवाशांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे कंपनीने दुपारी 2.30 नंतर पर्यायी विमानाची सोय केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
बेळगावमध्ये इंजिनिअरिंग विभाग असल्यामुळे लँडिंगला परवानगी
विमानामध्ये तांत्रिक दोष असल्याने मुंबईला निघालेले विमान काही अंतरावरून पुन्हा बेळगावला आणण्यात आले. बेळगावमध्ये इंजिनिअरिंग विभाग असल्यामुळे विमानतळ प्रशासनाने लँडिंगला परवानगी दिली. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.
-त्यागराजन (विमानतळ संचालक)









