आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांची सौंदत्ती येथील आरोग्य मेळाव्यात घोषणा
बेळगाव : खासगी इस्पितळांच्या धर्तीवर सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण व आरोग्य क्षेत्रावर सरकारने अधिक भर दिला असून, नागरिकांनी या आरोग्यसेवांचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खाते, बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था व विविध इस्पितळांच्या विद्यमाने सौंदत्ती येथील क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करून ते बोलत होते.
आजारांकडे दुर्लक्ष करू नका
जिल्ह्यात यापूर्वी असा आरोग्य मेळावा झाला नाही. प्रथमच सौंदत्ती येथे त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात मेळाव्यात भाग घेतला आहे. अधिकारी, जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी इस्पितळातील डॉक्टरांनी या मेळाव्यात आरोग्यसेवा पुरविली आहे. काही वेळा आजारांची कारणे माहीत नसतात. म्हणून कोणीही आजारांकडे दुर्लक्ष करू नये. मधुमेह, अतिरक्तदाब नियंत्रणात ठेवून उत्तम जीवन जगावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गोकाकमध्येही जिल्हा इस्पितळाच्या धर्तीवर नवे इस्पितळ उभारणार
सौंदत्ती येथे 46 कोटी रुपये खर्च करून मल्टिस्पेशालिटी इस्पितळ उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली. याबरोबरच रामदुर्ग, कित्तूर तालुक्यांनाही नवीन सुसज्ज इस्पितळे उभारण्यात येणार आहेत. खानापूर तालुक्यात नव्या इस्पितळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. गोकाकमध्येही जिल्हा इस्पितळाच्या धर्तीवर नवे इस्पितळ उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 38 हजार नेत्ररुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. भविष्यात गृहआरोग्य योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाची तपासणी करून घरपोच औषधे देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, सौंदत्ती येथे झालेल्या आरोग्य मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी कधीच असा मेळावा झाला नाही. सौंदत्तीच्या आमदारांच्या प्रयत्नांमुळे नव्या इस्पितळासाठी अर्थसंकल्पात निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. सौंदत्तीच्या विकासासाठी 200 कोटी रुपये अनुदान देण्यात येत आहे, असे सांगितले.
उपचारासाठी 8 हजाराहून अधिक जणांची नोंदणी
यावेळी सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांनी आरोग्य मेळावा ऐतिहासिक ठरल्याचे सांगत उपचारासाठी 8 हजाराहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे, असे सांगतानाच मुनवळ्ळी येथील प्राथमिक केंद्राचा दर्जा वाढविण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे आयुक्त शिवकुमार के. बी., जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आय. पी. गडाद, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील सरकारी अधिकारी, विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
अध्यक्षांचा आरोग्य मेळाव्यात सत्कार
2024 मध्ये जिल्ह्यातील 172 ग्राम पंचायती टीबीमुक्त म्हणून घोषित झाल्या आहेत. यापैकी 11 ग्राम पंचायतींच्या अध्यक्षांचा आरोग्य मेळाव्यात सत्कार केला. यावेळी इंचल येथील श्री शिवयोगीश्वर ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे आर्युरक्षा किट वितरित केले.









