अध्ययावत साधन सामग्रीसाठी बिम्सकडून 113 कोटींचा राज्यसरकारकडे प्रस्ताव : रुग्णालयाचे काम पूर्ण
बेळगाव : कोरोना काळानंतर आरोग्य व्यवस्थेवर सरकारकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गोरगरीब नागरिकांना अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. यासाठी बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (बिम्स) कडून मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला अध्ययावत साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी 113 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आल्याची माहिती बिम्सचे संचालक डॉ. अशोक शेट्टी यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये गोरगरीब नागरिकांना आवश्यक उपचार वेळेत मिळाले नसल्याने अनेक जणांना जीव गमवावा लागला, अनेक कुटुंबांची मोठी वाताहत झाली, अनेक कुटुंबे निराधार झाली. आरोग्य व्यवस्थेत निर्माण झालेल्या त्रुटी व साधनसामग्रींच्या तुटवड्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. याची जाणीव झाल्याने सरकारने सरकारी रुग्णालयांची स्थिती सुधारण्यावर भर दिला आहे. गोरगरीब नागरिकांना अत्याधुनिक उपचार सवलतींमध्ये उपलब्ध
व्हावेत यासाठी सरकारकडून आरोग्य व्यवस्थेच्या विकासावर भर दिला जात आहे. याचाच भाग असणाऱ्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांची व्यवस्था करून देण्यात येत आहे. येथील बिम्स आवारामध्ये निर्माण करण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रुग्णालयातील अंतर्गत कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. रुग्णालयाची इमारत 100 टक्के पूर्ण झाली आहे. भविष्यातील गरजा व सोयीसुविधा डोळ्यासमोर ठेवून इमारत बांधण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय आवश्यक साधनसामग्रीसाठी सरकारकडे बिम्सकडून प्रस्ताव देण्यात आला आहे. याबरोबरच तज्ञ डॉक्टरांची नेमणूक, आवश्यक मनुष्यबळ याची माहिती सरकारला देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती बिम्सच्या सूत्रांकडून देण्यात आली.
रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा…
रुग्णालय बांधकामासंदर्भातील काम पूर्ण झाले आहे. अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी 113 कोटींचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. आवश्यक असणाऱ्या तज्ञ डॉक्टर व मनुष्यबळाची माहितीही सरकारला देण्यात आली आहे. रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
– बिम्सचे संचालक डॉ. अशोक शेट्टी









