कोलकात्यातील महिला डॉक्टर बलात्कार-खून प्रकरणात शवविच्छेदनातून स्थिती स्पष्ट
वृत्तसंस्था / कोलकाता
कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या महिला डॉक्टर निर्घृण बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकाहून अधिक गुन्हेगारांचा सहभाग आहे, असे स्पष्टीकरण शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी केले आहे. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात एकच आरोपी समाविष्ट असल्याचे प्रतिपादन केले होते. या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता हे प्रकरण सीबीआयने हाती घेतले आहे. सीबीआय अधिकाऱ्यांचे एक दल बुधवारी सकाळी कोलकाता येथे पोहचले. या दलाने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच कोलकाता पोलिसांकडून आतापर्यंत झालेल्या तपासाची कागदपत्रे आपल्याकडे घेतली. कोलकाता पोलिसांची स्टेशन डायरीही सीबीआयकडे देण्यात आली आहे. गुन्हा घडलेल्या स्थानाचा पुन्हा एकदा पंचनामा सीबीआयकडून होण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ आणि संभाव्य स्रोतांकडून पुरावे संकलित करण्यास प्रारंभ केला आहे. तपास जसजसा पुढे जाईल तशा या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
एकाहून अधिकांचा सहभाग
डॉ. सुवर्णा गोस्वामी यांनी या प्रकरणातील पिडिता महिला डॉक्टरच्या शवविच्छेदनासंबंधी अनेक नव्या बाबी पुढे आणल्या आहेत. डॉ. गोस्वामी हे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक आहेत. त्यांनी शवविच्छेदन अहवालातील काही धक्कादायक बाबी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केल्या. पिडीत महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकाच गुन्हेगाराचा नव्हे, तर एकाहून अधिक गुन्हेगारांचा निश्चित समावेश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांचा दावा खोडला
कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात संजय रॉय नामक एकाच संशयिताला अटक केली आहे. या एकाच आरोपीने बलात्कार आणि हत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात एकापेक्षा अधिकांचा सहभाग स्पष्टपणे नोंदविला असल्याने पोलिसांचा दावा चुकीचा आहे, असे दिसून येते, असे डॉ. गोस्वामी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, या आरोपाला बळकटी मिळत आहे. आता हे प्रकरण सीबीआयकडे दिले गेल्याने सत्य बाहेर पडेल आणि अन्य आरोपींनाही अटक करण्यात येईल, अशी शक्यता वाढली आहे. तपास त्वरित केला जाईल, असे सीबीआयने स्पष्ट केले.
प्रकरणाचा घटनाक्रम…
कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला असणाऱ्या एका 31 वर्षीय महिला डॉक्टरवर अत्यंत कूरपणे बलात्कार करुन तिची हत्या करण्याचा प्रकार घडला होता. 9 ऑगस्टला ही महिला डॉक्टर तिची दिवसभराची कामे आटोपून रात्री 12 वाजण्याच्या आसपास महाविद्यालयाच्या विश्रांतीगृहात विश्रांती घेत असताना तिच्यावर अत्यंत निर्घृण पद्धतीने बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. 10 ऑगस्टला शनिवारी तिचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी तक्रार सादर केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. या युवतीने आत्महत्या केली आहे, अशी घोषणा पोलिसांनी प्रारंभी केली. मात्र, मृतदेहाची अवस्था बघून कोणालाही ती आत्महत्या वाटली नाही. तिच्या सहकाऱ्यांनी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला. तथापि, पोलिसांनी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आणि व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उग्र आंदोलनास प्रारंभ केला. त्यामुळे राज्य प्रशासनावर दबाव वाढला. त्यानंतर पोलिसांनी ही हत्या आहे आणि हत्येआधी बलात्कार करण्यात आला आहे, ही बाब पोलिसांनी मान्य केली. नंतर संजय रॉय नामक एका व्यक्तीला अटक झाली.
रॉय हा पोलिसांचा साहाय्यकर्ता
या प्रकरणात अटक करण्यात आलेला संजय रॉय हा आरोपी पोलिसांचाच खबऱ्या किंवा साहाय्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये तो दिसल्याने त्याला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. पोलिसांशी असलेल्या जवळीकीचा त्याने आजवर अनेकदा गैरफायदा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका समितीवरही तो होता.









