गायत्री हळर्णकर /पणजी
उपचारांद्वारे ऊग्णाला जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांचे महत्त्व अनन्यसाधारणच आहे. त्यात काहींनी मोठे यश संपादन केले आहे, तर काहींनी आदर्शवत कार्याचा वास्तुपाठच घालून दिलेला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून अशाच एका व्यक्तिमत्त्वाची दखल दै. तऊण भारतने घेतली आहे. प्रचंड कष्ट, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द, याचा संगम म्हणजे गोमंतकीय युवती डॉ. डिएल मार्टिन्स. जी सध्या दिल्लीत शिक्षण घेत असून, तिकडेच काम करत आहे. गोव्याचे नाव अभिमानाने उंचावत आहे. डिएल मार्टिन्स ही गोव्यातील असोळणा या ऐतिहासिक गावातील. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात सुंदर आठवणींमध्ये गेले. अगदी लहानपणापासून तिला एक सशक्त व्यक्ती व्हायची तीव्र इच्छा होती.
सर्वोत्तमतेचे संस्कार
गोवा सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालक डॉ. लेव्हिन्सन मार्टिन्स आणि शिक्षिका सुनीता मार्टिन्स यांची ती कन्या आहे. त्यांच्या सर्वोत्तम तत्त्वांसह ती वाढली. तसेच स्वतंत्र, निर्भय आणि नीतिमान असण्याच्या महत्त्वावर तिने जोर दिला. तेच तिच्या आयुष्यातील डॉक्टर बनण्याच्या प्रवासात किंवा तिच्या आवडीच्या असंख्य अभ्यासेतर क्रियाकलाप, भरतनाट्याम, बास्केटबॉल, गायन, अभिनय या सर्व प्रवासात शक्तीचे आधारस्तंभ म्हणून उभे राहिले, असे तिचे म्हणणे आहे.
डिएलने गाठली दिल्ली
तिने गोवा मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले, जिथे ती फिजियोलॉजीमध्ये सुवर्णपदक विजेती ठरली. तिने क्रीडा, संगीत आणि भरतनाट्याममध्येही प्रशंसा मिळविलेली आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये डीएम सुपरस्पेशलायझेशन करणे हे तिचे ध्येय होते. भारताच्या प्रतिष्ठित केंद्र सरकारच्या पीजीआयएमईआर (पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च), डॉ राम मनोहर लोहिया हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे एमडीमध्ये सध्या ती शिकत असून, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी ती ठरली आहे. जी वैद्यकीय केंद्रिय संस्थेत उच्च शिक्षण प्राप्त करत आहे आणि याच हॉस्पिटलमध्ये ऊग्णांची सेवा करत आहे.
सर्वात मोठे पुण्याचे कार्य
सर्वात पुण्याचे कार्य आमच्या हातून घडत असते. एखाद्या ऊग्णाला जेव्हा आम्ही उपचार देतो. तेव्हा त्याच्या जीवनाला स्पर्श करतो, त्यांच्या मानसिक किंवा शारीरिक वेदना कमी झाल्या तर यापेक्षा अधिक समाधानकारक कुठलीही गोष्ट नसते. व्यवसायाने डॉक्टर असल्याने ऊग्णसेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची जी जी संधी मिळेल. ती मी घेईन असे तिचे म्हणणे आहे. तिच्या यशाचे श्रेय तिच्या अभ्यासाप्रती असलेली कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणाला, तिच्या सर्व शिक्षकांनी आणि तिच्या पालकांनी अर्थातच देवाच्या आशीर्वादाने दिलेल्या शिकवणीला दिले आहे. डॉ राम मनोहर लोहिया हॉस्पिटल, नवी दिल्ली येथे पदव्युत्तरची विद्यार्थिनी ती आहे. ही आपल्या देशाची वैद्यकीय शास्त्राची केंद्रिय संस्था असून, इथे घेतलेल्या शिक्षणाबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिचे उर्वरित आयुष्य आणि प्रत्येक उत्तीर्ण दिवसाबरोबर ती नवीन कौशल्ये शिकत आहे आणि वृद्धांचा सन्मान करत आहे. प्राप्त झालेल्या प्रत्येक संधीमुळे एक चांगला डॉक्टर आणि सक्षम चिकित्सक बनण्यास मदतगार ठरेल असे तिचे म्हणणे आहे.
महिला दिनानिमित्त महिलांना संदेश…
आज महिला आणि पुऊष समानतेने काम करत आहेत, आणि ही समानता ओळखण्याच्या दृष्टीने समाजात चांगले बदल होताना मला दिसत आहे. महिलांनी एखाद्या गोष्टीबद्दल मनात ध्येय ठेवले तर त्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोपर्यंत प्रयत्न करणार नाही. तोपर्यंत तुम्ही किती सक्षम आहात हे तुम्हाला कधीच कळणार नाही. तसेच आजच्या स्त्रियांनी छोट्या क्षणात एकमेकांना आधार देण्याचे महत्त्व लक्षात ठेवले पाहिजे. प्रोत्साहनाचे कमी शब्द देखील कौतुकाचे स्वरूप निर्माण करून मोठ्या गोष्टी घडण्यास प्रमुख कारण ठरू शकतात. कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ बिंदू किंव्हा शेवटचा बिंदू नाही, हा अखंड प्रवास असून, लवचिक आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तयार व्हा! असे डॉ. डिएल मार्टिन्स यांचे म्हणणे आहे.









