स्वरसंध्या कार्यक्रमात अनुष्का शिकतोडे-आदिश तेलंग यांनी रसिकांना थिरकायला लावले
बेळगाव : मर्कंटाईल सोसायटी आयोजित स्वरसंध्या कार्यक्रमात अनुष्का शिकतोडे व आदिश तेलंग या नवोदितांनी बहुरंगी, बहुढंगी, वैविध्यपूर्ण गीते सादर करून टाळ्या मिळविल्या. रामनाथ मंगल कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी संध्याकाळी ही मैफल झाली. या दोन्ही कलाकारांनी सारेगमपच्या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकाविले आहे. कार्यक्रमाची सुरुवात ‘देवा श्रीगणेशा’ या प्रार्थनेने झाली. दमदार आवाजात हे गीत सादर करून आदिशने टाळ्या मिळविल्या. त्यापाठोपाठ त्याने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘कधी तू रिमझिमणारी बरसात’ ही गीते सादर करत रसिकांना ताल धरायला लावला. त्यापाठोपाठ आलेल्या अनुष्काने ‘शंभो शंकरा’ हे भक्तिगीत सादर करून आवाजावर असलेली पकड दाखवून दिली.
अनुष्काने ‘तेरी दिवानी हूं मैं’, ‘ही गुलाबी हवा’, ‘रुपेरी वाळूत’ ही गीते सादर केली. ‘हृदयात वाजे समथिंग’ या गीताला जोडूनच ‘दिल है छोटासा छोटीसी आशा’, हे गीत सादर केले. त्यानंतर आदिशने ‘भेटला विठ्ठल’ हे भक्तिगीत सादर केले. याशिवाय ‘गालावर खळी’ या मराठी गीतानंतर ‘मीतवा’ हे गीत सादर केले. पुन्हा अनुष्काने ‘आयुष्य हे कांदे-पोहे’, चंद्रा-वाजले की बारा’ या लावणीने रसिकांना ठेका धरायला लावला. तत्पूर्वी त्यांनी ‘सैराट झालं जी’ हे द्वंद्वगीत सादर केले. ‘अश्विनी ये ना’, डिपाडी डीपांग’, ‘कोंबडी पळाली’ ही गाणी सादर करून टाळ्या मिळविल्या. ‘ऐका दाजिबा’, ‘छम छम करता’, ‘गुलाबी आँखे’ अशी मेलडी सादर करून ‘झिंगझिंगाट’ गीतावर स्वत:बरोबरच रसिकांनाही थिरकायला लावले. या कलाकारांना तबला व ढोलकीवर प्रसन्न येरे, ढोलक हँडसॅनिकवर कलमेश पालकर, की-बोर्डवर सचिन आढाव, निलेश ओहाळ, ऑक्टोपॅडवर सुरेंद्र निकम, लीड गीटारवर सूरज कांबळे यांनी अत्यंत समर्पक व गीतांचा बाज लक्षात घेत साथ दिली. निवेदन परेश दाभोळकर यांनी केले. मर्कंटाईल सेवा संघाचे अध्यक्ष संजय मोरे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन आसावरी भोकरे यांनी केले.









