आग लावण्याच्या प्रकाराने झाडे धोक्यात : नागरिकांतून तीव्र संताप
प्रतिनिधी / बेळगाव
भाग्यनगर, मृत्युंजयनगर परिसरात झाडांचा पालापाचोळा गोळा करून झाडांच्या बुंध्यातच त्याला आग लावून देण्याचा प्रकार दररोज घडत आहे. वृक्षारोपण करावे म्हणून जनजागृती केली जाते. तसेच वृक्षारोपणही केले जाते. मात्र झाडे मोठी झाल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच काही नागरिकदेखील असा प्रकार करत आहेत. यामुळे पर्यावरणप्रेमी आणि मॉर्निंग वॉकर्स यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यात आली. अजूनही ही कामे अर्धवट स्थितीतच आहेत. शहर असो किंवा उपनगरे असो सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. यातच कचरा गोळा करून झाडांच्या बुंध्यांमध्ये त्याला पेटविले जात आहे. त्यामुळे अनेक झाडांचे बुंध्ये जळू लागले आहेत. त्यामुळे त्या झाडांचे नुकसान होत आहे. तेव्हा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तसेच सतर्क नागरिकांनी असा प्रकार करणाऱ्यांना जाब विचारावा, अशी मागणी करण्यात येत आहे.









