गुरुग्राममधील मेदांता इस्पितळात उपचारादरम्यान अखेरचा श्वास
गुरुग्राम / वृत्तसंस्था
गेल्या पंधरा दिवसांपासून येथील मेदांता रुग्णालयात उपचार घेत असलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी सोमवार, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकालीन आजारांमुळे त्यांच्यावर हरियाणातील गुरुग्राम इस्पितळात उपचार सुरू होते. मृत्यूसमयी पुत्र अखिलेश यादव यांच्यासह अन्य कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. मुलायम यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 3 वाजता सैफई हय़ा त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेशमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मुलायमसिंह यादव यांना किडनी संसर्गासोबतच रक्तदाबाचाही त्रास होता. 26 सप्टेंबरपासून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती रविवारी दुपारी अचानक बिघडली होती. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यांच्यावरील उपचारांसाठी तज्ञ डॉक्टरांचे विशेष वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. प्रकृती बिघडताच त्यासंबंधीची सर्व माहिती त्यांचा पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना देण्यात आली होती. मुलायमसिंह यांच्या अत्यवस्थ प्रकृतीची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्रीच अखिलेश यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत विचारपूस केली होती. आता त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह विविध राजकीय व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.
मूत्रपिंड विकार, मधुमेह, श्वासोच्छवासाचा त्रास, ऑक्सिजनची खालावलेली पातळी आणि कमी रक्तदाब आदी वृद्धापकालीन आजारांमुळे गेल्या आठ-दहा महिन्यांपासून मुलायम यांची प्रकृती ढासळत चालली होती. यापूर्वी 24 जून 2022 रोजी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे नियमित तपासणी व उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच 15 जूनलाही मेदांता येथे दाखल करण्यात आले होते. येथे आरोग्य तपासणी करून दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. वास्तविक, मुलायमसिंह यादव गेल्या दोन वर्षांपासून आजारी आहेत. समस्या वाढल्याने त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल केले जात होते.
मुलायमसिंह हे सध्या मैनपुरी मतदारसंघातून लोकसभेचे खासदार होते. 22 नोव्हेंबर 1939 रोजी जन्मलेले मुलायमसिंह हे उत्तर प्रदेशातील सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक होते. त्यांनी उत्तर प्रदेशचे तीनवेळा मुख्यमंत्रिपद भूषवले आणि केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले. ते 10 वेळा आमदार आणि 7 वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.
यापूर्वी, याच वषी जुलैमध्ये त्यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे निधन झाले होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. साधना गुप्ता या मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱया पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी मालतीदेवी यांचे 2003 मध्ये निधन झाले.
समाजवादी-शेतकरी नेते अशी ओळख
उत्तर भारतातील समाजवादी आणि किसान नेते अशी मुलायमसिंह यादव यांची ओळख होती. एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशात राजकीय क्षेत्रातही स्वतःचा दबदबा निर्माण केला. अल्पावधीतच मुख्यमंत्रिपदापर्यंत झेप घेत त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशात आपला प्रभाव निर्माण केला. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशातील इतर मागासवर्गीय समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाचे काम केले. त्यांच्या सामाजिक जाणीवेमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात ओबीसींना महत्त्वाचे स्थान आहे.
राजकीय जीवनाची रंजक कहाणी
मुलायमसिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावामधील सैफई गावात झाला. त्यांचे वडील सुघरसिंह यादव आणि आई मूर्ती देवी शेती करायचे. त्यांच्या राजकीय जीवनाची कथाही खूप रंजक आहे. त्यांचे वडील सुघरसिंह यादव हे मुलायम कुस्तीपटू बनण्याची इच्छा बाळगून होते. त्यांनी कुस्ती स्पर्धेत आपले राजकीय गुरू चौधरी नथुसिंग यांना प्रभावित करत राजकारणात प्रवेश केला. अशा प्रकारे नथुसिंह यांचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या जसवंतनगर येथून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ते मूळचे शिक्षक होते, पण शिक्षण सोडून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि समाजवादी पक्षाची स्थापना केली.
राजकीय प्रवास
आपल्या राजकीय कारकिर्दीत मुलायम 1967 पासून आठवेळा विधानसभेवर निवडून आले. 1982 ते 1985 दरम्यान ते विधान परिषदेचे आमदार होते. 1989 मध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. तसेच दुसऱया कार्यकाळात 1993 मध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा कायम ठेवली. तिसऱया कार्यकाळात 2003 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. 1985 ते 87 या कालावधीत त्यांनी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची धुरा समर्थपणे पेलली होती. तसेच 2014 मध्ये ते आझमगडचे खासदार झाले होते.
केंद्रीय राजकारणापर्यंत धडक
मुलायमसिंह यादव हे भारताचे संरक्षण मंत्रीही राहिले होते. 1996 मध्ये त्यांचा केंद्रीय राजकारणात प्रवेश झाला. काँग्रेस पक्षाचा पराभव करून संयुक्त आघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले होते. पण हे सरकारही फार काळ टिकले नाही आणि तीन वर्षांत भारताला दोन पंतप्रधान दिल्यानंतर ते सत्तेतून बाहेर पडले.
राजकीय तत्वज्ञान आणि परदेश प्रवास
राष्ट्रवाद, लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर मुलायमसिंह यादव यांचा अढळ विश्वास होता. भारतीय भाषा, भारतीय संस्कृती आणि शोषित-पीडित वर्गाच्या हितासाठी त्यांनी अथक संघर्ष केला. त्यांनी ब्रिटन, रशिया, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, पोलंड आणि नेपाळ इत्यादी देशांनाही भेटी दिल्या. त्यांनी कायदेशीर क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. समाजात बंधुभावाची भावना निर्माण करून, लोकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचे विशेष योगदान आहे. अनेक विधी विद्यापीठांमध्येही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांना 28 मे 2012 रोजी लंडनमध्ये ‘आंतरराष्ट्रीय ज्युरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.
गुजरातमधील सभेतून पंतप्रधानांची श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी गुजरातमधील भरूच येथे आयोजित एका जाहीर सभेला संबोधित करताना मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली वाहिली. मुलायमजींचे जाणे हे देशाचे मोठे नुकसान आहे. मुलायमजींसोबत माझे विशेष नाते होते. आम्ही दोघेही मुख्यमंत्री असल्यापासून एकमेकांना भेटायचो. त्यापासून दोघांमध्येही आपुलकीचे संबंध होते. 2014 मध्ये माझी पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर माझ्या ओळखीच्या लोकांना मी आशीर्वाद घेण्यासाठी बोलावले. त्या दिवशी मुलायमजींनी आशीर्वाद देताना बोललेले दोन शब्द माझ्या कायमचे स्मरणात राहणार आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले.









