पुणे : आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थितांनी साश्रु नयनांनी त्यांना अखरेचा निरोप दिला. यावेळी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
दीर्घ आजाराने गुरूवारी मुक्ता टिळक यांचे खासगी रूग्णालयात निधन झाले. काल सकाळी त्यांचे पार्थिव नारायण पेठेतील टिळकवाडय़ातील निवास्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेशकुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख,
आदींनी अत्यदर्शन घेतले.
अधिक वाचा : पुणे विमानतळावर आजपासून थर्मल स्क्रिनिंग
फुलांनी सजविलेल्या वाहनातून टिळकवाडा ते वैकुंठ स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. वाटेत ठिकठिकाणी राजकीय पक्ष, संस्था, संघटना, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण केले. तसेच नागरिकांनी अंत्ययात्रा मार्गावर पुष्पवृष्टी केली. वैकुंठ स्मशानभूमीच्या परिसरात पोलिसांनी सलामी दिली. हवेत तीन फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस उपायुक्तांनी पुष्पचक्र वाहिले. पोलिसांनी तिरंगा टिळक कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. त्यानंतर मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.








