संकेतस्थळावरून ई-केवायसी करताना वारंवार तांत्रिक त्रुटी येत आहेत
By : किरण पाटील
कसबे डिग्रज : महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील लाखो पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची थेट आर्थिक मदत देण्यात येत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. परंतु अलीकडेच शासनाने सर्व लाभार्थीना ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेत अनेक महिलांना तांत्रिक व भाषिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
संकेतस्थळावरून ई-केवायसी करताना वारंवार तांत्रिक त्रुटी येत आहेत. ई-केवायसी पर्यायामध्ये वापरण्यात आलेली जटिल वाक्यरचना महिलांना समजण्यात अडथळा ठरत आहे. परिणामी, महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. योजनेचा उद्देश स्तुत्य आहे, पण तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र लाभार्थीना वेळेत मदत मिळू शकत नाही.
शासनाने तातडीने स्पष्ट व सोप्या भाषेत सूचना उपलब्ध करून द्याव्यात. ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तांत्रिक सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. दरमहा मिळणारे हे पंधराशे रुपये महिलांसाठी केवळ आर्थिक मदत नसून घरगुती खर्चाला हातभार, मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य व स्वतःच्या गरजांसाठी मोकळेपणाने वापर करता येणारा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे ही रक्कम कोणत्याही अडथळ्याशिवाय वेळेत मिळणे महिलांसाठी आवश्यक आहे.
शासनाने या संदर्भात त्वरित कार्यवाही करून संकेतस्थळावरील त्रुटी दुरुस्त कराव्यात, ई-केवायसी प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगावी आणि तांत्रिक सहाय्यकांची नेमणूक करावी, अशी सर्वसामान्य महिलांची अपेक्षा आहे. यामुळे योजनेचा खरा उद्देश साध्य होईल आणि लाडकी बहीण योजना प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत निविर्घ्न पोहोचेल.
डिजिटल प्रक्रियेशी अनभिज्ञ
“अनेक महिला डिजिटल प्रक्रियेशी अनभिज्ञ आहेत. अशा परिस्थितीत शासनाने ग्रामपंचायत, चावडी, सेतू कार्यालय, सीएससी केंद्रांमार्फत मार्गदर्शन शिबिरे घेऊन महिलांना मदत करणे आवश्यक आहे.”
– कोमल पाटील, चेअरमन, महिला सोसायटी








