महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा : निपाणीतील अर्जुननगर येथे महारोजगार मेळाव्यास उदंड प्रतिसाद
निपाणी : सीमाभागातील मराठी माणसे ज्या परिस्थितीतून जात आहेत याची आपणासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कल्पना आहे. यासाठीच सीमाभागातील बेरोजगार तऊण-तऊणींसाठी महारोजगार मेळावा घेणार असल्याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. त्यानुसार त्यांनी रोजगार मेळावा घ्या, त्याबरोबरच सीमावासियांसाठी एमआयडीसी सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आवश्यक प्रयत्न केले जातील. त्याबरोबरच महाराष्ट्रातील उद्योजकांप्रमाणे सीमाभागातील उद्योग-व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी लवकरच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना लागू करण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. सीमाभागातील बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व देवचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त रविवारी देवचंद महाविद्यालयात महारोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छ. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मंत्री सामंत पुढे म्हणाले, सीमावादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे जे करता येईल ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.
हा प्रŽ निकाली लागेपर्यंत येथील मराठी माणसाच्या पाठीशी राहून त्यांच्या विकासासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रातील उद्योजकांना मिळणाऱ्या सवलती सीमाभागातील मराठी उद्योजकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच प्रत्येकवषी शिवजयंती दिवशी सीमाभागात महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार मिळावा घेण्यात येईल. याबरोबरच सीमाप्रश्नासंदर्भात सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात येईल. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाने मोठे सहकार्य केले असून या संस्थेला यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.
तऊणाईची नाळ महाराष्ट्राशी
हातकणंगलेचे खासदार तसेच सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने म्हणाले, सीमाभागातील मराठी माणूस स्वराज्याची लढाई लढत आहे. या लढाईसाठी संपूर्ण महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी आहे. सीमाभागातील तऊणाईची नाळ महाराष्ट्राशी जोडली आहे. अशावेळी या युवा पिढीच्या आयुष्याला विधायक वळण लागावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पहिल्यांदाच भव्य प्रमाणात रोजगार मेळावा घेण्यात आला आहे. सीमाभागात रोजगार निर्मितीबरोबरच रोजगार देणारे हातही निर्माण व्हावेत यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या योजना उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी म्हणाले, सीमाभागातील रोजगाराच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळावा घेतला, ही कौतुकास्पद बाब असून दिवसेंदिवस जटील होत चाललेल्या सीमाप्रश्नासंदर्भातही लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी व्यापक मेळावा घ्यावा, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी युवा पिढीला मार्गदर्शन करताना, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनतीला पर्याय नसून मेहनतीत सातत्य असेल तर यश निश्चित मिळते, हे लक्षात ठेवावे, असे सांगितले. यावेळी उद्योग खात्याचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, किरण रहाणे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, राजेखान जमादार, संस्थेच्या उपाध्यक्षा तृप्ती शाह, खजिनदार सुबोध शाह, प्राचार्य पी. पी. शाह, जयराम मिरजकर, निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष बंडा पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत कदम, अजित पाटील, बेळगाव युवा सेनेचे अध्यक्ष अंकुश केसरकर, अमोल शेळके यांच्यासह मान्यवर, विविध खात्यांचे अधिकारी, देवचंद महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, युवा समितीचे सर्व सदस्य, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. युवा समितीचे प्रमुख शुभम शेळके यांनी आभार मानले.
निपाणीतील राजकीय नेत्यांची पाठ
सीमाभागातील बेरोजगार युवक-युवतींच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे हा मेळावा निपाणीनजीक आयोजित करण्यात आला होता. मात्र निपाणी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अथवा करू इच्छिणाऱ्या कोणत्याही नेत्याने या रोजगार मेळाव्यात सहभागी होणे टाळले. त्यामुळे मतांसाठी धडपड करत असणाऱ्या नेत्यांना युवक-युवतींसाठी आयोजित केलेला हा मेळावा महत्त्वाचा वाटला नाही का?, असा नाराजीचा सूर कार्यक्रमस्थळी उमटत होता.
4 हजारावर उमेदवारांची नोंदणी
या मेळाव्यात बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, इन्शुरन्स, ऑटोमोबाईल, सॉफ्टवेअर, आयटी, हॉस्पिटल, हॉटेल, रियल इस्टेट, हेल्थकेअर, मॅनेजमेंट यासह विविध क्षेत्रातील 90 हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यासाठी तब्बल 4000 हून अधिक तऊण-तऊणींनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे 3600 जणांनी मुलाखती दिल्या. यातील 650 पात्र उमेदवारांना थेट नियुक्ती पत्रे देण्यात आली. तर 850 जणांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. विशेष म्हणजे या मेळाव्यात निम्म्याहून अधिक मुली सहभागी झाल्या होत्या. शासनामार्फत प्रथमच झालेल्या या रोजगार मेळाव्याला सीमाभागातील तऊण-तऊणींचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.
सीमावासियांना आरक्षणाचा लाभ द्या
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष शाह म्हणाले, शरद पवारांनंतर राज्य सरकारमार्फत सीमावासियांसाठी वेगळे उपक्रम फारसे घेण्यात आले नव्हते. मात्र या रोजगार मेळाव्यामुळे सीमावासियांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील मराठी भाषिक मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये फक्त सामान्य प्रवर्गात न गणता त्यांच्या जातीनुसार त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या मागणीचे निवेदनही महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उद्योगमंत्र्यांना देण्यात आले.









