कपिलदेव सिंग हत्या प्रकरणात 5 लाखांचा दंडही ठोठावला
वृत्तसंस्था/ गाझीपूर
उत्तर प्रदेशातील एका हत्या प्रकरणात खासदार-आमदार न्यायालयाने शुक्रवारी माफिया मुख्तार अन्सारीला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच न्यायालयाने आरोपी मुख्तारला 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याच प्रकरणातील दुसरा आरोपी सोनू यादव याला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाखांचा दंड सुनावला आहे. हे प्रकरण कपिलदेव सिंह हत्या प्रकरणाशी संबंधित आहे.
खासदार-आमदार न्यायालयाने 26 ऑक्टोबर रोजी माफिया मुख्तार अन्सारी याला एका हत्येशी संबंधित प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यावेळी मुख्तार अन्सारीविऊद्ध कारंडा पोलीस ठाण्यात गँगस्टर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे कपिलदेव सिंह हत्या प्रकरणाने संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली होती. हे हत्याकांड 2009 साली घडले होते. 2010 मध्ये या हत्येप्रकरणी मुख्तार अन्सारीविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुख्तार अन्सारीविरुद्ध 19 एप्रिल 2009 रोजी कपिलदेव सिंह हत्याकांड आणि 24 नोव्हेंबर 2009 रोजी मीर हसन हल्ला प्रकरणात गुंडाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यांत मुख्तार अन्सारी याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी मुख्तार अन्सारी याच्यावर 120बी म्हणजेच कट रचल्याचा आरोप केला होता, पण ते सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले होते. त्यामुळे मुख्तारची न्यायालयाने मुख्य प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. मात्र आता न्यायालयाने त्याला गँगस्टर अॅक्ट प्रकरणात दोषी ठरवले आहे. कपिलदेव सिंह आणि मीर हसन या दोन्ही प्रकरणांमध्ये मुख्तार अन्सारीविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्सारीला यापूर्वी वाराणसीच्या खासदार/आमदार न्यायालयाने 5 जून रोजी दोषी ठरवले होते. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय राय यांचा मोठा भाऊ अवधेश राय याच्या हत्येप्रकरणीही त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरोधात त्याने न्यायालयात दाद मागितली आहे. यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचे रेकॉर्ड मागवले आहे. याचिकेत कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून शिक्षा रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने काही आठवड्यांपूर्वी मुख्तार अन्सारीविऊद्ध मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून जमीन, एक इमारत आणि 73.43 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बँक ठेवी जप्त केल्या होत्या. या मालमत्तांची एकूण नोंदणीकृत किंमत 73 लाख 43 हजार 900 रुपये असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले.









