अंबानी यांची संपत्ती 8.08 लाख कोटीवर : गौतम अदानींना टाकले मागे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
श्रीमंतांमध्ये अव्वलस्थानी असलेल्या गौतम अदानी यांना मागे टाकत आता रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘360वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023’मध्ये अंबानी हे 8.08 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह अव्वलस्थानी राहिले आहेत.
या यादीत गौतम अदानी हे दुसऱ्या स्थानी राहिले आहेत. त्यांची संपत्ती ही 4.74 लाख कोटी रुपये आहे. हिंडेनबर्ग संशोधन अहवालामुळे अदानींच्या एकूण संपत्तीत लक्षणीय घट झाली आहे. हुरुन इंडियाचे हे भारतातील सर्वात श्रीमंत लोकांचे 12 वे वार्षिक रँकिंग आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस पूनावाला यांनी 2.78 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसरे स्थान कायम ठेवले आहे. एचसीएलचे शिव नाडर 2.28 लाख कोटींच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत. तर गोपीचंद हिंदुजा 1.76 लाख कोटींच्या संपत्तीसह पाचव्या स्थानी राहिल्याची माहिती आहे. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि नेते दिलीप संघवी हे 1.64 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर राहिले आहेत. एलएन मित्तल, राधाकिशन दमानी, कुमार मंगलम बिर्ला आणि नीरज बजाज यांचाही पहिल्या दहामध्ये समावेश राहिला आहे.
यांची संपत्ती या देशांच्या जीडीपीसोबत
हुरुन लिस्ट लाँच झाल्यानतंर पहिल्यांदाच या यादीत समाविष्ट असलेल्या धनाढ्यांची संपत्ती ही 109 लाख कोटी रुपये झाली आहे. यात सिंगापूर, यूएई आणि सौदी अरेबिया याच्या एकत्रित जीडीपीपेक्षा अधिक संपत्ती असल्याची माहिती आहे.
20 वर्षीय कैवल्य सर्वात तरुण अब्जाधीश
सदर यादीमध्ये एकूण 259 अब्जाधीश आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत 38 अधिक राहिले आहेत. जेइपीटीओचे संस्थापक कैवल्य वोहरा (वय20) हे या यादीमधील सर्वात तरुण अब्जाधीश राहिले आहेत.









