पुढील 5 वर्षासाठी चेअरमन व व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळणार : रिलायन्सच्या 46 व्या एजीएममध्ये घोषणा
► वृत्तसंस्था/ मुंबई
‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या (आरआयएल) 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) मुकेश अंबानी आणखी पाच वर्षे कंपनीचे अध्यक्ष राहतील अशी घोषणा करण्यात आली. आता ते पुढील 5 वर्षासाठी रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळणार आहेत. मात्र, नीता अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. नीता अंबानींच्या माघारीमुळे आकाश, अनंत आणि ईशा यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भागधारकांना संबोधित करताना कंपनीने गेल्या वर्षभरात उचललेली महत्त्वाची पावले आणि आगामी वर्षांतील कंपनीच्या योजनांची माहिती दिली. नवीन भारत आत्मविश्वासाने भरलेला असून त्याला आता रोखता येणार नाही, असे प्रतिपादनही केले. 15 ऑगस्ट रोजी आम्ही आमचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे हा भारत थांबत नाही, खचून जात नाही, दमत नाही. …या भारताला थांबवता येणार नाही. चांद्रयान-3 चे यशही आपल्याला तेच सांगते. भविष्यात भारत काय साध्य करू शकतो याच्या शक्मयता अमर्याद आहेत. भारताने गेल्या दहा वर्षात मोठमोठे किंवा गुंतागुंतीचे प्रकल्प हाती घेत जागतिक मानकांनुसार परवडणाऱ्या किमतीत वेळेपूर्वी पूर्ण केले आहेत. याच गतीने पुढे गेल्यास 2047 पर्यंत आपण भारताला विकसित-समृद्ध भारत बनवू शकतो, यासाठी व्यापारी समुदायाने एकत्र काम करण्याची वेळ आली आहे, असेही ते पुढे म्हणाले.
‘जिओ सिनेमा’चा विश्वविक्रम
रिलायन्सच्या मीडिया आणि मनोरंजन व्यवसायाने गेल्यावषी लक्षणीय प्रगती केली असून त्यात जिओ सिनेमाचे योगदान सर्वाधिक आहे. आयपीएलला पहिल्यांदाच जिओ सिनेमावर विनामूल्य स्ट्रीम करण्यात आले होते. त्यानंतर या पोर्टलवर 45 कोटी दर्शकांसह जागतिक विक्रम नोंदवल्याचेही अंबानी यांनी स्पष्ट केले.
डिसेंबरपर्यंत देशभर ‘जिओ 5-जी’ सेवा
जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या 45 कोटींच्या पुढे आहे. भारतात सर्वात वेगवान 5जी रोलआउट झाले आहे. वापरकर्ता दरमहा सरासरी 25 जीबी डेटा वापरतो. जिओची कमाई आतापर्यंतच्या उच्च पातळीवर आहे. जिओ 5-जी सेवा अवघ्या नऊ महिन्यांत देशातील 96 टक्के शहरांमध्ये पसरली आहे. आता डिसेंबरपर्यंत 5जी सेवा संपूर्ण भारतात पोहोचेल. देशातील एकूण 5जी सेवेमध्ये जिओचा 85 टक्के नेटवर्क हिस्सा आहे. दर 10 सेकंदाला एक 5जी ग्राहक जोडला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जिओ एअर फायबरची प्रतीक्षा संपली असून गणेश चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी ती लॉन्च करण्याची घोषणाही त्यांनी केली.
नीता अंबानींचा ‘आरआयएल’ बोर्डाचा राजीनामा
नीता अंबानी यांनी कंपनीच्या संचालकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स फाऊंडेशनला अधिक वेळ देण्यासाठी नीता अंबानी यांनी ‘आरआयएल’च्या बोर्डाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या बदलाला मान्यता देण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि ईशा अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर गैर-कार्यकारी संचालकांच्या नियुक्तीसाठी मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच बोर्डाने नीता अंबानी यांचा राजीनामाही स्वीकारला आहे.









