वृत्तसंस्था/ मुंबई
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघाने रविवारी अफगाणचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानशी नवा करार केला आहे. मुंबई इंडियन्स संघातील गझनफर दुखापतीने जायबंदी झाल्याने तो या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सने गझनफरच्या जागी मुजीबशी बदली खेळाडू म्हणून करार केला आहे.
अफगाणचा 18 वर्षीय फिरकी गोलंदाज गझनफर याच्या पाठीच्या मणक्यातील हाड दुखावले होते. ही दुखापत पूर्णपणे बरी झालेली नाही. या दुखापतीमुळे तो पाकमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही खेळू शकणार नाही. अलिकडेच झिंबाब्वे दौऱ्यावर खेळताना गझनफरला ही दुखापत झाली होती. मुजीब उर रहमानने वयाच्या 17 व्या वर्षी आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. मुजीबने आतापर्यंत 300 टी-20 सामन्यात 330 गडी बाद केले आहेत. 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी झालेल्या क्रिकेटपटूंच्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने गझनफरला 4.80 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते.









