तालिबानचा सर्वोच्च नेता अखुंदजादाचा आदेश
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानातील तालिबानचा सर्वोच्च नेता हिबातुल्लाह अखुंदजादने तालिबानी दहशतवाद्यांना देशाबाहेर हल्ले न करण्याचा ताकीद दिली आहे. तालिबानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूबने अफगाणिस्तान सुरक्षा दलांना संबोधित करताना ही माहिती दिली आहे. सर्वोच्च नेत्याच्या निर्देशाशिवाय जर कुणी जिहादसाठी अफगाणिस्तानबाहेर जात असल्यास त्याला जिहाद मानले जाणार नसल्याचे याकूबने म्हटले आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अखुंदजादाने तालिबानच्या सदस्यांना हा आदेश दिला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये अलिकडेच झालेल्या स्फोटात 50 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती. पाकिस्तानात हल्ले करण्यासाठी दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानातून रसद मिळत असल्याचा आरोप केला जातो.
अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून पाकिस्तानातील दहशतवादी हल्ले वाढले आहेत. दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातून मदत मिळत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सांगणे आहे. दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आता अल-कायदाशी मैत्री करू पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण आशियातील सर्व दहशतवादी गटांनी एकत्र यावे असा प्रयत्न सुरू असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात अनेक दहशतवादी संघटनांची प्रशिक्षण केंद्रे आहेत. या केंद्रांचा वापर टीटीपीच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षित करण्यासाठी केला जात आहे.









