वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
झिंबाब्वेचा क्रिकेट संघ लंकेच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यामध्ये उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका आयोजित केली आहे. या मालिकांसाठी झिंबाब्वे क्रिकेट मंडळाने सोमवारी संघाची घोषणा केली असून यामध्ये 33 वर्षीय फिरकी गोलंदाज तपीवा मुफुझाला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.
झिंबाब्वे संघाचे काळजीवाहू प्रशिक्षक वॉल्टर चावागुता यांनी मुफुझाची या दौऱ्यासाठी निवड केली आहे. गेल्या महिन्यात प्रमुख प्रशिक्षक डेव्ह हॉटन यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा त्याग केल्यानंतर चावागुता यांची हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. झिंबाब्वे संघामध्ये नवोदीत वेगवान गोलंदाज फराज अक्रमचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला असून तो या दौऱ्यात आपले वनडे पर्दापण करेल. यापूर्वी फराज अक्रमने झिंबाब्वेच्या टी-20 संघात स्थान मिळविले होते.
लंका आणि झिंबाब्वे यांच्यातील तीन वनडे सामने अनुक्रमे 6, 8, आणि 11 जानेवारीला तर तीन टी-20 सामने 14, 16, आणि 18 जानेवारीला आयोजित केले आहेत. हे सर्व सामने कोलंबोत होणार आहेत. या र्दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या झिंबाब्वेच्या टी-20 संघामध्ये वनडे संघातील मुफुझा, अक्रम, कैटेनो यांना वगळण्यात आले असून ब्रायन बेनेट, कार्ल मुंबा व एन्डलोवू यांचा समावेश राहिल.
झिंबाब्वे वनडे संघ : क्रेग इर्व्हिन (कर्णधार), फराझ अक्रम, रेयान बुरी, जे. गुंबी, जाँग्वे, टी. कैटेनो, के. तिनाशी, क्लाईव्ह मॅडेंडे, वेलिंग्टन मासाकेझा, मुफुझा, मुनयोंगा, मुझारबनी, रिचर्ड एन्गरेव्हा, सिकंदर रझा, मिल्टन शुंभा.
झिंबाब्वे टी-20 संघ : सिंकदर रझा (कर्णधार), ब्रायन बेटेन, क्रेग इर्व्हिन, रेयान बुरी, जे. गुंबी, जाँग्वे, के. तिनाशी, क्लाईव्ह मॅडेंडे, वेलिंग्टन मासाकेझा, मुनयोंगा, रिचर्ड एन्गरेव्हा, मिल्टन शुंभा, कार्ल मुंबा, बी. मुझरबानी, ए. एन्डलोवू.









