प्रतिनिधी/ बेंगळूर
धर्मस्थळ प्रकरणातील एसआयटी चौकशीमुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. धर्मस्थळाच्या मुद्यावरून आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चिखलफेक सुरू असून धर्मस्थळाबद्दलच्या चुकीच्या माहितीचा निषेध करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने रविवारी मोठ्या संख्येने धर्मस्थळात जाऊन तेथे संकल्प पूजा केली. तर काँग्रेसने भाजपवर धर्मस्थळाच्या मुद्यावर राजकारण केल्याचा आरोप केला आहे.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले की, धर्मस्थळ ही भाजपची मालमत्ता नाही. गृहमंत्री सोमवारी सभागृहात धर्मस्थळ प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती देतील. धर्मस्थळाचा भक्त म्हणून मी माझ्या भावना एवढ्याच व्यक्त केल्या आहेत. मात्र, धर्मस्थळाच्या मुद्यावर भाजप राजकारण करत आहे, असे म्हणत टीका केली.
धर्मस्थळावर झालेल्या आरोपांना मुक्ती मिळावी. ते खरे आहे की खोटे हे नागरिकांना समजण्यासाठी आम्ही एसआयटीची स्थापना केली आहे. आता त्याठिकाणी काहीही आढळून न आल्याने भाजप धर्मस्थळाच्या बाजूने रॅली काढत आहे. त्यांनी इतके दिवस रॅली का काढली नाही? एसआयटी स्थापन झाल्यावर ते का बोलले नाहीत. आता ते राजकारण करायला आले आहेत. याला धर्मस्थळासाठी रॅली म्हणण्यापेक्षा भाजपची राजकीय रॅली म्हणता येईल, अशी टीकाही शिवकुमार यांनी केली.
श्री क्षेत्र धर्मस्थळाबद्दल सतत चुकीची माहिती पसरवली जात आहे. राज्य सरकारने ती रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार बी. वाय. विजयेंद्र यांनी केली आहे. रविवारी धर्मस्थळमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपने या मुद्यावर राजकारण केलेले नाही. काँग्रेसने श्री क्षेत्र धर्मस्थळबद्दल चुकीची माहिती पसरवली आहे. असंख्य भक्तांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचेही षड्यंत्र रचले गेले आहे, असे सांगितले.
दबावामुळे एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे, असे मंत्री दिनेश गुंडू राव यांनी स्वत: म्हटले होते, ही बाब विजयेंद्र यांनी माध्यमांच्या निदर्शनास आणून दिली. धर्मस्थळाबद्दल आणखी किती चुकीची माहिती पसरवायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रचारामागील शक्तींची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आज सभागृहात तपशील देणार : गृहमंत्री परमेश्वर
धर्मस्थळातील मृतदेह दफन करण्याच्या प्रकरणासंदर्भात एसआयटीच्या चौकशी अहवालाबाबत सोमवारी सभागृहात तपशील देणार असल्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले. रविवारी चामराजनगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, धर्मस्थळ प्रकरणात कोणीही राजकारण करू नये. हा न्याय आणि कायद्याशी संबंधित विषय आहे. कोणीही एफआयआर दाखल केल्यास त्याची चौकशी करणे स्वाभाविक आहे. त्यानुसार, धर्मस्थळ प्रकरणात एसआयटीचा तपास सुरू आहे. तपास अंतिम झाल्यानंतर उत्तरे मिळतील. तथापि, धार्मिक बाबींमध्ये राजकारणाला स्थान नाही. धर्मस्थळ प्रकरणाबाबतच्या अंतरिम अहवालावर एसआयटीचे अधिकारी निर्णय घेतील. सरकार यात हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.









