नागरिकांना नाहक त्रास : संबंधितांनी लक्ष देण्याची गरज
बेळगाव : वडगाव-अनगोळ रोड येथील नाझर कॅम्प, सहावा क्रॉस व आनंदनगरला जोडणारा रस्ता हा गेल्या महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. या भागात जाण्यासाठी इतर मार्गावरून वळसा घालून जावे लागत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रस्त्याच्या मधोमध गटार निर्मितीच्या कामानंतर मातीचा ढिगारा तसाच ठेवण्यात आला असून तो कधी हटविणार? असा प्रश्न येथील स्थानिक नागरिक विचारत आहेत. गटारीचे काम पूर्ण होऊनही अद्याप प्रशासनाने हा रस्ता पूर्ववत न केल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील रहिवाशांच्या घरात धूळ साचत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन सदर रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटवावा आणि हा रस्ता खुला करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.









