भातावर झाकण्यासाठी ताडपत्र्यांची जमवाजमव
वार्ताहर/कडोली
कडोली परिसरात रविवारी दुपारी पावसाने जोरदार मारा केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून पाणी साचलेल्या शिवारातील उर्वरीत भातसुगी साधायची कशी असा प्रश्न पडला आहे. गेल्या तब्बल महिनाभरापासून कडोली परिसरात भातसुगीची कामे सुरू आहेत. जसजशी शिवारातील भातजमीन सुकेल तशी भाताची कापणी होत आहे. अद्याप अनेक ठिकाणी कापणीची कामे शिल्लक आहेत. भात पिकातील पाण्याचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे सदर भातसुगी लांबली आहे. अशातच पुन्हा रविवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पावसात कापलेली काही भातपिके आणि मळण्या सापडल्या आहेत.
योग्य हंगामाच्या प्रतीक्षेत शेतकरी
मळण्यावर झाकण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिकची जमवाजमव करण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. उर्वरीत भाताची कापणी करण्यासाठी योग्य हंगाम मिळाला नाही तर काही शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
मजगाव येथे शेतकऱ्यांची उडाली तारांबळ
मजगाव, अनगोळ, पिरनवाडी परिसरातील भात मळण्या अवकाळी पावसात सापडल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. गेले चार दिवस या परिसरात ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस नव्हता. परंतु रविवारी दुपारी अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अर्धवट मळण्या झाल्याने त्यावर ताडपत्री झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत होते. परंतु रविवारच्या पावसाने सुमारे तासभर झोडपल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बळीराजा पुन्हा संकटात अडकला. हातातोंडाला आलेले भातपीक पुन्हा कुजण्याच्या मार्गावर आहे. या परिसरातील निम्याहून अधिक भातकापणी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कडधान्य पेरणी केली आहे. परंतु रविवारच्या पावसाने झोडपल्याने पेरणी केलेल्या शेतामध्ये पुन्हा पाणी साचल्याने शेतकऱ्यांची हजारोची बियाणे वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. वळीवामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.









