ऑनलाईन टीम/तरुण भारत
पावसाळा हा आनंद देणारा ऋतू आहे. सगळीकडे हिरवीगार गर्द झाडी आणि वातावरणातील थंडावा याचा मनसोक्त आनंद आपल्याला या दिवसात घेता येतो. भटकंती करणाऱ्यांसाठी ‘सोने पे सुहागा’च म्हणावा लागेल. मात्र या दिवसात आनंदाबरोबर काही आजारही उध्दभवतात. आणि हे आजार दुषित पाण्यातून होतात.
अशावेळी पिण्याचे पाणी शुध्द करून पिणे गरजेचे असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद झाल्याने भूक कमी होते. त्यामुळे जेवण कमी जाते व अशक्तपणा जाणवू लागतो. अशक्तपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन शरीर अनेक आजारांना बळी पडू शकते. यासाठी घरगुती छोट्या-छोट्या टिप्सचा वापर करून या आजारापासून दूर राहू शकता. यासाठी राॅकेट सायन्स करायची गरज नाही तर घरच्या-घरी आपण उपाय करू शकतो. चला तर कोणते उपाय करायचे ते जाणून घेऊया.
तुरटीचा वापर करा
पावसाळ्यात अतिशय गढूळ पाणी येते. हे पिण्यास अयोग्य असल्याने अनेक आजार उध्दभवतात. यासाठी अतिशय सोपा उपाय म्हणजे पाण्यात तुरटी फिरवणे. तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाण्याचा साठा करून स्वच्छ हात धुवून तुरटी फिरवू शकता. तुरटीमुळे पाण्यातील माती तळाला जाऊन बसते आणि शु्ध्द व स्वच्छ पाणी तुम्ही पिण्यास वापरू शकता. स्वच्छ झालेले पाणी तुम्ही दुसऱ्या भांड्यात ओतून पुन्हा पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी फिरवून पाणी भरून ठेवू शकता.
पाणी उकळून घ्या
पावसाळ्यामध्ये पाणी दूषित होतं. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटाचे विकार होतात. कॉलरा, टायफाईड सारखे आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्यावं. तुम्ही पाणी उकळून गार करून पिऊ शकता.
नळाला गढूळ पाणी आल्यास उपाय
पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी येते. अशावेळी नळाला स्वच्छ पांढरे कापड बांधून नंतर पाणीसाठा करता येतो. तसेच पाणी शुध्द करण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या पाणी गाळण्याच्या चाळण मिळतात. त्याचा वापर तुम्ही करू शकता.
पाणी शुध्द करण्यासाठी ड्राॅप्सचा वापर करा
आज बाजारात पाणी शुध्द करण्यासाठी अनेक ड्रॉप्स मिळतात. याचे दोन ते तीन थेंब पाण्यात टाका. मात्र कोणताही ड्राॅप्स वापरताना तुम्ही एकदा डाॅक्टरांचा सल्ला घ्या. या सर्व गोष्टीची काळजी घेवून तुम्ही पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून सुटका मिळवू शकता.









