वाळवंटी नदीपात्र पडले कोरडे : डबक्यातील गढूळ पाण्याचा पुरवठा पडोसे प्रकल्पात
उदय सावंत/केरी : आज संध्याकाळ पासून सत्तरी तालुक्यात पावसाला सुऊवात झाली. यामुळे धरण परिसरातील नागरिकाकडून समाधान व्यक्त होत आहे. सध्यातरी अजुंणे धरणाच्या पाण्याची पातळी पूर्णपणे खालावलेली आहे. धरण प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडून उपलब्ध पाणी पंपिंगद्वारे नदीपात्रात सोडण्याची प्रक्रिया आज हाती घेण्यात आली. मात्र सदर पाणी पूर्णपणे गढूळ आहे. यातून काही प्रमाणात वाळवंटी नदीच्या प्रवाहाला संजीवनी प्राप्त झालेली आहे. सदर पाणी पडोसे प्रकल्पाला प्राप्त झाल्यानंतर पडोसे प्रकल्पाला उद्भवणारी पाण्याची समस्या काहीप्रमाणात दूर होऊ शकते. दरम्यान, केरी भागांत आतापर्यंत केव दीड इंच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 20 जूनपर्यंत सुमारे सहा इंच पावसाची नोंद झाली होती. यामुळे वाळवंटी नदीचा प्रवाह सक्रिय झाला होता. सध्या वाळवंटी नदीपात्र बहुतांश भागात कोरडे पडल्याचे चित्र आहे. यामुळे आता केवळ नदीच्या पात्रातील काही डबक्यांमध्ये गढूळ पाणी असल्याचे दिसत आहे.
धरण प्रकल्पाची पातळी कमालीची घटली
दरम्यान, या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, धरण प्रकल्पाची पाण्याची पातळी पूर्णपणे खालावलेली आहे. 1997 नंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुमारे 25 वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. धरण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग बंद केला आहे. धरणातील पाण्याची पातळी घटल्याने व्यवस्थापनाकडून शुक्रवारी शिल्लक साठा पंपाद्वारे वाळवंटी नदीच्या पात्रात सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. यामुळे वाळवंटी नदीचा काही प्रमाणात जिवंत झाला आहे.
पावसाच्या दडीमुळे परिस्थिती गंभीर
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारलेली आहे. गुऊवारी धरण प्रकल्पाचा परिसर वगळता इतर ठिकाणी काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र सदर भागांमध्ये अजिबात पाऊस झाला नाही. यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. आज संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळण्यास सुऊवात झाली. पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्यास सदर भागांमध्ये वाळवंटी नदीचा प्रवाह कार्यान्वित होईल. त्याचप्रमाणे धरणाच्या जलाशयामध्ये काही प्रमाणात पाण्याचा साठा होऊ शकतो. दरम्यान, गेल्या वर्षी 20 जून पर्यंत या भागांमध्ये सहा इंच पावसाची नोंद झाली होती. यामुळे धरणाच्या जलाशयामध्ये पाण्याचा साठा होण्यास सुऊवात झाली होती.. यंदाची परिस्थिती मात्र विचित्र आहे आतापर्यंत केवळ दीड इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
केरी परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा
वाळवंटी नदीच्या पाण्याचा वापर करून केरी या ठिकाणी कार्यान्वित असलेल्या प्रकल्पातून केरी व संबंधित परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असतो. गेल्या काही दिवसापासून गढूळ पाण्याचा पुरवठा प्रकल्पाला होऊ लागला असून तो शुद्ध होण्यास प्रकल्पाच्या यंत्रणेवर ताण येत आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना मात्र गढूळ पाण्याचा पुरवठा करण्याची पाळी प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर आलेली आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून केरी भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. दरम्यान सदर भागांमध्ये फेरफटका मारला असता. सध्या केवळ वाळवंटी नदीच्या पात्रातील डबक्यात पाणी साठल्याचे चित्र दिसत आहे. या डबक्यांमधील पाणी गढूळ असून सदर पाण्याचा पुरवठा पडोसे प्रकल्पाला होणे शक्य नाही. यामुळे सदर प्रकल्पावरही मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. दरम्यान तिलारी प्रकल्पाचे पाणी पडोसे प्रकल्पाला पुरवण्याची प्रयत्न जलसंपदा खात्याकडून करण्यात येत आहे, मात्र अद्याप यश आलेली नाही.
विर्डी, वाघेरी भागात पाऊस झाल्यास वाळवंटीचा प्रवाह सक्रिय
दरम्यान सध्या तरी अजूनही धरणाच्या प्रकल्पाच्या जलाशयामध्ये पाण्याचा साठा होऊन त्याचा कोणताही फरक वाळवंटी नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर होणार नाही. वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढण्यासठी विर्डी व वाघेरी भागामध्ये मुबलक पाऊस पडणे आवश्यक आहे. सदर भागांमध्ये पाऊस पडल्यास वाळवंटी नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह पुन्हा एकदा सुरू होऊ शकतो, तसे झाल्यास पडोसे प्रकल्पाची यंत्रणा कार्यान्वित होईल.









