साईनगर, श्रीरामनगर, गोकुळनगरमध्ये शुभारंभ करूनही कामाला सुरुवात नाही
वार्ताहर/सांबरा
मुतगे ग्रामपंचायत हद्दीतील साईनगर, श्रीरामनगर व गोकुळनगर परिसरामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी पूजन करून सात महिने उलटले. तरीही अद्याप रस्त्याचे काँक्रिटीकरण न केल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. साईनगर श्रीरामनगर व गोकुळनगर परिसरामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी कृती आराखडा बनविण्यात आला होता व कॉंक्रिटीकरणासाठी निधीही मंजूर झाला होता. सात महिन्यापूर्वी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व पीडीओंच्या उपस्थितीत पूजनही करण्यात आले. मात्र ग्रामपंचायतीला अजूनही कॉंक्रिटीकरणाचा मुहूर्त मिळालेला नाही. कॉंक्रिटीकरण करण्याकडे पंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीचे पीडीओ थातूरमातूर कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत. त्यामुळे काँक्रिटीकरणाच्या निधीचा गैरवापर झाल्याचा संशय नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. जर रस्त्याचे कॉंक्रिटीकरणच करायचे नव्हते तर पूजन कशासाठी केला, असा संतप्त सवालही नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
गोकुळनगर, श्रीरामनगर व साईनगर भागातून सर्वाधिक कर भरला जातो. मात्र या भागांमध्ये सुविधा पुरवण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना चिखलातून येताना जाताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून ग्रामपंचायतीचे विकास कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे. तरी ग्रा.पं.ने रस्त्यांचे काँक्रिटीकरण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आठवड्यात काम सुरू न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा
साईनगर, गोकुळनगर व श्रीरामनगर येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी साधारण सात महिन्यापूर्वी पूजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रत्यक्ष पीडीओदेखील उपस्थित होते. त्यानंतर लगेच रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला प्रारंभ करणे गरजेचे होते. मात्र पीडीओ काम सुरू करण्यासाठी चालढकल करत राहिले. त्यामुळे काँक्रिटीकरणाचे काम रखडले असून नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी पीडीओनी येत्या आठ दिवसात काँक्रिटीकरणाचे काम सुरू न केल्यास ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसणार आहे.
– रवी कोटबागी, ग्रा. पं. सदस्य










