बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : चिखल तातडीने दूर करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
तुरमुरी गावाच्या दुतर्फा नागरिकांच्या घरासमोर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने घरामध्ये ये-जा करणे मुश्कील झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अक्षम दुर्लक्षपणामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.बेळगा वेंगुर्ली मार्गावरील तुरमुरी गावच्या या एक किलोमीटर पटट्ट्यामध्ये दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र दोन वर्षाच्या आतच रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. मोठमोठे खड्डे आणि खड्ड्यातून साचणारे पाणी यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यातून साचणाऱ्या पाण्याचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्याने अनेक वाहने यात अडकून वाहने नादुरुस्त होत आहेत. तसेच खड्ड्यात वाहने गेल्याने नागरिक पडून दुखापती होण्याचे प्रकार आता वाढले आहेत. यासाठी तातडीने हे खड्डे बुजवणे महत्त्वाचे आहे. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची अनेक राहती घरे आहेत. या घरांच्या समोरच चिखलाचे अक्षरश: साम्राज्य पसरले आहे. यामुळे या नागरिकांना घरामध्ये ये-जा करणे नाकीनऊ येत आहे. परिणामी नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे.
अन्यथा बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा
सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याच्या दुतर्फा गटारींची खोदाई न केल्याने येणारे पाणी रस्त्यावर आणि रस्त्याच्या दुतर्फा साचून चिखलाचे साम्राज्य बनले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या चिखलाची विल्हेवाट लावावी अन्यथा बांधकाम खात्याच्या कार्यालयावर तुरमुरी गावातून मोर्चा काढून याचा जाब विचारला जाईल असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा असलेला चिखल तातडीने दूर करा
सार्वजनिक बांधकाम खात्याने सातत्याने रस्त्याच्या राहत्या घरांच्या बाजूला गटारींची खोदाई केल्याने माळ जमिनीतून येणारा पाण्याचा लोंढा या रस्त्यावरून रस्त्याच्या दुतर्फा साचून चिखलाचे साम्राज्य बनत आहे. पाणी कित्येक वेळा घरामध्येही शिरल्याच्या अनेक वेळा घटना घडल्या आहेत. यासाठी बांधकाम खात्याने तातडीने गटारींची बांधणी करून रस्त्याच्या दुतर्फा असलेला चिखल तातडीने दूर करून नागरिकांचे होणारे हाल थांबवावे.
– वैशाली खांडेकर, तुरमुरी.









