एलअँडटीच्या कामाबाबत ग्रामस्थांतून नाराजी, ऐन पावसाळ्यात काम हाती
बेळगाव : एलअँडटी कंपनीकडून शहर व उपनगरात 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. कणबर्गीत देखील गेल्या काही दिवसापासून पाईपलाईन घालण्यासाठी खोदकाम केले जात आहे. मात्र अशास्त्रीय पद्धतीने पाईप लाईन घालण्यासह निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर केल्याने घातलेली पाईपलाईन पुन्हा काढली आहे. ऐन पावसाळ्यात खोदकाम केल्याने सर्वत्र चिखल झाल्याने याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. 24 तास पाणी योजनेसाठी राकसकोप जलाशय ते लक्ष्मीटेक जलशुद्धीकरण प्रकल्प, त्यानंतर हिडकल ते बसवणकोळ जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत मुख्य जलवाहिनी घातली आहे. वनखात्याची परवानगी मिळत नसल्याने हिडकलकडून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे काही काम अर्धवट आहे. तसेच घरोघरी नळजोडणीसाठी गल्लोगल्लीत पाईप घालण्याचे काम सुरू आहे. पोकलॅनद्वारे काँक्रिटचे रस्ते फोडले जात आहेत. खोदकाम केलेल्या चरीमध्ये पाईप घातल्यानंतर माती ओढली जात आहे. मात्र त्याठिकाणच्या खोदकाम केलेल्या रस्त्यावर काँक्रीट किंवा डांबरीकरण केले जात नसल्याने सदर चरी धोकादायक बनल्या आहेत. शहर व उपनगरात ही समस्या गंभीर बनली आहे.
पाईपचा दर्जा सुमार असल्याने पुन्हा काढली पाईप
मनपा हद्दीत येणाऱ्या कणबर्गीतही पाईप घालण्यासाठी खोदकाम केले आहे. काही ठिकाणी खोदलेल्या चरीमध्ये पाईप घातली होती. मात्र पाईपचा दर्जा सुमार असल्याने पुन्हा पाईप बाहेर काढली आहे. पुन्हा नव्याने पाईप घालण्याचे काम सुरू आहे. ऐन पावसाळ्यात खोदकाम हाती घेतल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे चिखलातून ग्रामस्थांना वाट शोधावी लागत आहे. याचा फटका अबालवृद्धासह महिला वर्गाला सुद्धा सहन करण्याची वेळ आली आहे.
आता घरोघरी नळजोडणी
यापूर्वी प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी दिली होती. मात्र आता एलअँडटीकडून एक घराला एक नळ जोडणी दिली जात आहे. याबाबत नुकतीच माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सुंठकर, दीपक वाघेला, अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांची भेट घेऊन एलअँडटीबाबत अनेक समस्या मांडल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत एलअँडटीच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.









