खोदाईमुळे सर्वत्र निसरड : वाहनधारकांची गैरसोय, अपघाताचा धोका
बेळगाव : यंदे खूट ते शौर्य चौक दरम्यानच्या मार्गाची वाताहत झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांची दमछाक होऊ लागली आहे. विकासकामासाठी या मार्गावर खोदाई करण्यात आली आहे. मात्र रस्त्यावर चिखल आणि निसरड झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. विशेषत: पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीधारकांचे हाल होऊ लागले आहेत. या मार्गावर जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र माती पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान, पावसामुळे निसरड होऊ लागली आहे. त्यामुळे ये-जा करणे धोक्याचे बनू लागले आहे. या मार्गावर तुडये, राकसकोप, बेळगुंदी, बेनकनहळळ, बाकनूर, गोल्याळी, सोनोली, यळेबैल, गणेशपूर आदी गावातील नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे वर्दळ अधिक प्रमाणात आहे. मात्र रस्त्यावर चिखल पसरला आहे.
कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱ्या रस्त्यावर ही अवस्था निर्माण झाली आहे. आधीच हा रस्ता अरुंद असल्याने ये-जा करणे अडचणीचे होते. त्यातच एका बाजूने खोदाई केल्यामुळे वाहतूकही विस्कळीत होऊ लागली आहे. खोदाई करून माती आणि दगड त्या ठिकाणीच टाकण्यात आले आहेत. दरम्यान पावसामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मात्र या कामामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. काही ठिकाणी खोदाई करून माती त्याच ठिकाणी टाकण्यात आली आहे. त्यामुळे चिखल होऊ लागला आहे. परिणामी निसरड होऊन वाहनधारक पडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी चिखलात वाहने अडकू लागली आहेत. यंदे खूट ते शौर्य चौक मार्गावरील चिखलाची स्वच्छता करून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.









