एसव्हीसी 54 चित्रपटात करणार काम
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या ‘कुशी’ चित्रपटावरून चर्चेत आहे. विजयने आता आणखी एक चित्रपट स्वीकारला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन परशुराम हे करणार असून यात मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारणार आहे. विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक परशुराम यांनी यापूर्वी ‘गीता गोविंदम’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. तर त्यांच्या नव्या चित्रपटाला तूर्तास ‘एसव्हीसी54’ नाव देण्यात आले आहे.

श्री वेंकटेश्वर क्रिएशन्सचा हा 54 वा चित्रपट असल्याने हे नाव सध्या देण्यात आले आहे. दिल राजू आणि सिरीश यांच्याकडून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. याचे चित्रिकरण हैदराबाद येथे सुरू झाले आहे. दिग्गज निर्माते श्याम प्रसाद रे•ाr हे चित्रिकरणाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित होते. ‘सीता रामम’ या प्रचंड गाजलेल्या चित्रपटानंतर मृणाल ठाकूर पुन्हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली आहे.
विजय देवरकोंडा लवकरच समांथा रुथ प्रभूसोबत ‘कुशी’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे. तर मृणाल ठाकूर ही यापूर्वी ‘सीता रामम’ तसेच गुमराह या चित्रपटात दिसून आली होती. सीता रामम या चित्रपटात दुलकर सलमान हा अभिनेता मुख्य भूमिकेत होता. मृणालने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करण्यासह दक्षिणेतही स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे.









